Breaking News

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

Advertisements

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची बाब उघड झाली आहे. भारतातही या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. २०२५ च्या अखेरीस प्रत्येकी पाचपैकी एका पुरुषाला आणि सहापैकी एका महिलेला कर्करोगाची लागण होणार असल्याचा अंदाज ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून, कित्येकांना कर्करोगाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यादरम्यान प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

Advertisements

 

भारतात कर्करोगाने दर दोन मिनिटांना तीन मृत्यू

Advertisements

भारतात दर दोन मिनिटांना तीन लोकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून समोर आली आहे. भविष्यात हा आकडा आणखीनच वाढणार असल्याची भीती एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये देशात कर्करोगाचे २० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले. २०२४ मध्ये हा आकडा सुमारे १६ लाखांच्या आसापास होता. त्याआधी २०२३ मध्ये १४ लाख ९६ हजार, २०२२ मध्ये १४ लाख ६१ हजार आणि २०२१ मध्ये १४ लाख २६ हजारांपेक्षा जास्त कर्करोगाची प्रकरणे नोंदवली गेली होती. यावरून देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या दरवर्षी वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

कर्करोगाच्या मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक

कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातील १६.३ टक्के मृत्यू तोंडाच्या कर्करोगामुळे, आठ टक्के मृत्यू फुप्फुसाच्या कर्करोगामुळे व ६.८ टक्के मृत्यू पोटाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेच्या आकडेवारीत नमूद आहे. गेल्या काही वर्षांत पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. धूम्रपानाशी संबंधित कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात घट दिसून आली असली तरीही त्यामुळे होणाऱ्या मृत्यूदरात वाढच झाली आहे.

 

कोणत्या राज्यात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात २०२४ मध्ये कर्करोगाचे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात एक लाख २७ हजार रुग्णांची नोंद झाली; तर पश्चिम बंगालमध्ये एक लाख १८ हजार, बिहारमध्ये एक लाख १५ हजार, तमिळनाडूत अंदाजे ९८ हजार व कर्नाटकमध्ये सुमारे ९५ हजार कर्करोगाची प्रकरणे समोर आली आहेत. देशातील इतर राज्यांमध्येही या जीवघेण्या आजाराचा प्रसार वेगाने होत असून, सरकार आणि आरोग्य यंत्रणांसमोर कर्करोगावर नियंत्रण मिळविण्याचे संकट उभे राहिले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात तंबाखूचे सेवनामुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण सर्वाधिक आहे.

 

२०३५ पर्यंत परिस्थिती आणखीनच गंभीर होणार?

केवळ पुरुषांमध्येच नाही, तर महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक व केरळ या राज्यांमध्येही कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये जगभरात कर्करोगाचे दोन कोटी नवीन रुग्ण आढळले होते, ज्यापैकी ९७ लाख लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारतात दरवर्षी १० ते १४ लाख नवीन रुग्णांची नोंद होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी तब्बल ७७ टक्क्यांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो. परिस्थिती अशीच राहिल्यास २०३५ पर्यंत या आजाराने मोठ्या संख्येतील लोकांना प्राण गमवावे लागू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कर्करोगाचा हा वाढता प्रसार रोखण्यासाठी लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे आता देशासमोरील मोठे आव्हान आहे.

 

कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची कारणे कोणती?

वेळेवर निदान न झाल्याने कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी आवश्यक ती साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्युदराचा धोकाही वाढतो आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. देशामध्ये कॅन्सरच्या दर २,००० रुग्णांमागे केवळ एकच डॉक्टर उपलब्ध आहे. याउलट अमेरिकेसारख्या विकसित देशात दर १०० रुग्णांमागे एक डॉक्टर आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील हे प्रमाण पाहता, भारतातील रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ वैद्यकीय सुविधा वाढवणे पुरेसे नसून, तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवणेही गरजेचे असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

 

महिलांमध्येही वाढतोय कर्करोगाचा धोका

गेल्या काही वर्षांत कर्करोगग्रस्त महिलांची संख्या वेगाने वाढते आहे. त्याला बदलती जीवनशैली व चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या सवयीदेखील याला जबाबदार आहेत. स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, मोठ्या आतड्याचा कर्करोग महिलांमध्ये आढळून येत आहे. या जीवघेण्या आजाराचा सर्वाधिक फटका गरीब मजूर आणि शेतकरी वर्गाला बसत आहे. बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यांमधील खाणी, सिमेंट कारखाने, दगडखाणी, वीटभट्ट्या व रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना कर्करोगाचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. सरकारी पातळीवर जनजागृती मोहिमा राबवल्या जात असल्या तरीही ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. कर्करोगाचा हा वाढता प्रभाव न रोखल्यास २०३५ पर्यंत देशात लाखो मृत्यू होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए स्वस्थ्य आँखों के लिए पोषण आहार 

जानिए स्वस्थ्य आँखों के लिए पोषण आहार   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। …

सुंदर की चाह में महिला ने दुबई में कराई दांतों की सर्जरी?नरक बनी जिंदगी

सुंदर की चाह में महिला ने दुबई में कराई दांतों की सर्जरी?नरक बनी जिंदगी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *