कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात होते. त्याअनुषंगाने कोरोना उपचार आणि क्वारंटाईन सेंटर घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीने नोटीस बजावल्याची माहिती आहे. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारपासून कोरोना काळात झालेल्या खरेदीच्या चौकशीला सुरुवात होईल.
प्रकरण काय?
मुंबई महानगर पालिकेत कोरोना काळात ज्या स्वरुपाचं टेंडरिंग झालं, त्यात काही विशिष्ट कंपन्यांना टेंडर देण्यात आल्याचा आरोप आहे. या विशिष्ट कंपन्यांकडूनच वैद्यकिय उपकरणं खरेदी करण्यात आली होती. या संपूर्ण खरेदीची चौकशी ईडीमार्फत सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई महानगर पालिकेच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याची माहिती आहे.
येत्या सोमवारपासून या चौकशीला सुरुवात होणार आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची तक्रार सातत्याने विरोधी पक्षाकडून केली जात होती. पण कोरोना काळातील खरेदीला चौकशीच्या फेऱ्यात आणता येणार नाही असं मुंबई मनपाने सांगितलं होतं.