Breaking News

विदर्भातील सर्व बार बंद होणार? : मद्यप्रेमींची चिंता वाढली

शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा निर्णय बार संचालकांनी घेतला आहे. येत्या दहा दिवसांत सरकारने अन्यायकारक मूल्यवधित कर (व्हॅट) रद्द न केल्यास विदर्भातील सर्व बार चालक आपले व्यवसाय बेमुदत बंद ठेवतील, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. अमरावती परमीट रूम असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी ही माहिती दिली आहे.

 

राज्य शासनाने मद्य विक्रीवरील व्हॅट ५ टक्क्यांवरून १० टक्के, परवाना शुल्कात १५ टक्के आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर (आयएमएफएल) उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. विदर्भातील सर्व जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूर येथे घेण्यात आली. १० टक्के व्हॅट हा फक्त बार चालकांवरच लादला गेला. मद्याच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ४०० बार व त्यावर अवलंबून असलेल्या १५ हजार कुटुंबीयांवर बेकारीची वेळ आली आहे, असे नितीन मोहोड यांचे म्हणणे आहे.

 

केवळ बार चालकांवरच लादलेला व्हॅट रद्द करावा या मागणीसाठी सरकारकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने देऊनही व्हॅट रद्द केला नाही. मद्यविक्री दुकानामधून मधून मद्याच्या बाटल्या विकत घेऊन रस्त्यावर, धाब्यांवर, हातगाडींवर मद्य सेवन करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाईन शॉपची विक्री तिपटीने तर देशी दारूची विक्री २० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच हातभट्टी, नकली दारू, परराज्यातून तस्करी करून येत असलेल्या दारूचा महापूर आला आहे, असे नितीन मोहोड यांनी सांगितले.

 

सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे बारचालकांना व्यवसाय करणे परवडत नसून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे. हातभट्टीच्या दारूचा महापूर आल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशारा नितीन मोहोड यांनी दिला आहे.

 

उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई करूनही खुल्या ठिकाणी मद्य सेवन सुरू आहे. त्यांच्याच आशीर्वादाने सर्रास धाब्यांवर, वाईन शॉपच्या जवळ उघडपणे मद्यसेवन केले जाते. त्यामुळे हॉटेल व्यवसाय डबघाईस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास त्यांना हे संकट लक्षात येईल, असे मोहोड यांनी सांगितले. नागपूर येथे झालेल्या बैठकीत राजीव जयस्वाल, किशोर धारड, परविंदर सिंग भाटिया, पवनीकर, राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मोहोड यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

विदर्भात पावसामुळे सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा …

कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *