मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळ्याची दुर्घटना घडली आहे. अलीकडेच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची घटना ताजी आहे.रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेला डोंगराचा काही भाग कोसळून चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये मातीचे ढिगारे शिरले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली होती. झोपेत असतानाच अचानक मातीचे ढिगारे चाळीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दरड दुर्घटनामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पाच ते सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रामबाग सोसायटीच्या शेजारी असलेल्या डोंगरावरुन चाळीवर सतत माती कोसळत आहे. त्यामुळे चाळीमधील 165 घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचा दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे पथर घटनास्थळी दाखल झाले आहे. चाळीमधील नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सध्या सुरु आहे.