नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. एका बाजुचा रस्ता बंद असल्यामुळे अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. हा रस्ता बंद केल्यामुळे अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांवर आगपाखड करीत आहेत.
गेल्या मंगळवारपासून रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळे लोहा पुलाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात करण्यात आला. त्यामुळे कॉटन मार्केट चौकातून सीताबर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बाधित झाली आहे. विशेषतः सायंकाळी कॉटन मार्केट चौकातून चहुबाजुंना जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. तसेच भाजीबाजारात जाणारे ग्राहक आणि रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांचीही वर्दळ असते.
आता हा मुख्य रस्ता बंद केल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोहा पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने जवळपास ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, कामाचे स्वरुप आणि कामाची गती बघता आणखी पाच ते सहा महिने या रस्त्यावरील वाहतूक सुरु होणार नाही, अशी माहिती आहे. रस्ता बंद केल्यानंतर सीताबर्डीकडे जाणाऱ्या वाहनचालकांची अडचण झाली असून अनेक वाहनचालक थेट विरुद्ध दिशेने वाहन चालवून नवीन आरयुबीच्या आतमधून निघण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हा प्रकार धोकादायक असून मोठ्या अपघातास निमंत्रण देणारा ठरणारा आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळातील पोलीस कर्मचारी चोवीस तास लोहापुल समोरील रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. वाहनचालकांना दिशानिर्देश आणि विरुद्ध दिशेने जाण्यापासून वाहतूक पोलीस रोखत आहेत. मात्र, सीताबर्डी आणि रेल्वेस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वाराकडून कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या बघता कॉटन मार्केटमध्ये मोठी कोंडी निर्माण होत आहे.
वाहतूक पोलिसांशी हुज्जत
वाहतूक कोंडी होऊ नये तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये म्हणून बंद करण्यात आलेल्या रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे राहतात. मात्र, अनेक वाहन चालक रस्ता बंद केला म्हणून विचारणा करुन विरुद्ध दिशेने वाहन नेण्याचा प्रयत्न करतात. वाहतूक पोलिसांनी रोकल्यास हुज्जत घालतात, असा प्रकार नेहमीचाच असल्याचे दिसत आहे.
वाहनचालकांना त्रास होऊ नये आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून आम्ही चौकापूर्वीच दर्शनिय भागात रस्त बंद असल्याबाबत फलक लावलेले आहेत. वळण रस्त्याबाबत फलकावर सविस्तर माहिती दिली आहे. विजय टॉकीज चौकातून वळण मार्ग देण्यात आला आहे. चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रमोद पोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कॉटन मार्केट विभाग)