सध्या कोरोनाच्या Omicron BA.2 व्हेरिएंटमुळे चीन आणि दक्षिण कोरियासह युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. यातच तज्ञांकडून या व्हेरिएंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसची चौथी लाट (coronavirus fourth wave) येऊ शकते का?
याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या दरम्यान मागील कोरोना लाटांमध्ये देशात सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्र राज्यात सरकारने सतर्कतेचा इशार जारी केला असून कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
आम्हाला केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याचे पत्र मिळाले आहे, कारण युरोपीय देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोविड रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाने डीसींना सावध राहण्यासाठी आणि आवश्यक पावले उचलण्याचे पत्र जारी केले होते,” अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.
गेल्या 24 तासांत, काही देशांमध्ये दोन वर्षांतील आतापर्यंतच्या सर्वाधिक नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. काही नवीन व्हेरिएंटमुळे इस्रायल आणि इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा संशय आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ प्रदीप व्यास यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून 17 मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
व्यास पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी लोक गर्दी करणार नाहीत याची खात्री करावी, तसेच मास्क घालण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करावे आणि इन्फ्लूएंझा सारख्या आजारांबाबत सतर्क राहावे. त्यांनी जिल्ह्यांना कोविड लसीकरण मोहिमेला गती देण्यास सांगितले सोबतच रुग्णांच्या वाढीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास आवश्यक ती पावले उचलतील, असे देखील ते म्हणाले.