हिंदी चित्रपट सृष्टीतला माईलस्टोन चित्रपट म्हणजे शोले. या चित्रपटात अमजद खान यांनी केलेली भूमिका म्हणजेच गब्बर ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांनी त्यांच्या अभिनयातून आणि हावभावांमधून जो गब्बर साकारला त्याची दहशत वाटायची. याच अमजद खान यांचा मृत्यू होऊनही जवळपास २७ वर्षे उलटली आहेत. त्यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलं याची माहिती आता त्यांच्या मुलाने म्हणजेच शादाब खान यांनी एका मुलाखतीत दिली आहे.
२७ जुलैच्या रात्री काय घडलं होतं?
२७ जुलै १९९२ च्या रात्री अमजद खान यांचे मुंबईतील राहत्या घरी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय अवघे ५१ वर्षे होते. शादाब खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे, वजन वाढले आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केवळ काही सेकंदांच्या उशिरामुळे आपण वडिलांना वाचवू शकलो नाही, अशी वेदनादायी आठवण त्यांनी शेअर केली आहे.
अवघ्या काही सेकंदांचा उशीर झाला आणि…
शादाब खान यांनी २७ जुलै १९९२ च्या रात्रीचा प्रसंग सांगताना म्हटले, “त्या रात्री नेहमीप्रमाणे जेवून अमजद खान त्यांच्या खोलीत गेले. रात्री अचानक आई धावत माझ्या खोलीत आली. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासले आणि तातडीने एक इंजेक्शन आणायला सांगितले. अवघ्या काही मिनिटांत इंजेक्शन घेऊन मी धावत घरात आलो. पण मी घराी पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी सांगितले की, अमजद खान आता या जगात नाहीत. केवळ काही सेकंदांचा उशीर झाला होता.” अशी आठवण शादाब खान यांनी सांगितली.
अमजद खान यांनी शोले चित्रपटातील भूमिका अजरामर केली आहे यात शंकाच नाही.
घरातली सगळी क्रॉकरी फोडली होती-शादाब खान
शादाब पुढे म्हणाले, वडिलांच्या अचानक जाण्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांनी रागाच्या आणि दुःखाच्या भरात घरातील महागडी क्रॉकरी तोडून टाकली आणि भिंतीवर हात मारून स्वतःला जखमी करून घेतलं होतं. या अत्यंत कठीण काळात महानायक अमिताभ बच्चन अमजद खान यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पडद्यावर जरी ‘जय आणि गब्बर’ एकमेकांचे शत्रू असले, तरी खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन आणि त्यांच्या जोडीने सलीम खान यांनी अमजद खान यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला सख्ख्या भावासारखी आर्थिक आणि मानसिक मदत केली होती.
द ग्रेट गॅम्बलर सिनेमाच्या दरम्यान काय घडलं होतं?
‘द ग्रेट गॅम्बलर’ चित्रपटाच्या शूटिंगला जाताना अमजद खान यांचा एक भयंकर अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांच्या फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली होती आणि ते कोमात गेले होते. उपचारानंतर ते सुखरूप परत आले खरे, पण त्यानंतर सुरू असलेल्या कडक वैद्यकीय उपचारांमुळे आणि जड औषधांमुळे त्यांचे वजन अनियंत्रितपणे वाढलं आणि याच वाढलेल्या वजनामुळे अखेर त्यांच्या हृदयावर ताण आला. त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
अमजद खान यांची निवड शोले सिनेमासाठी कशी झाली?
जावेद अख्तर यांनी अमजद खान यांच्याविषयी म्हणाले होते, “१९६३ मध्ये मी एक युथ फेस्टिव्हल पाहिला होता. तिथे एक नाटक झालं होतं ज्याचं नाव होतं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ मी त्यात अमजद खानला पाहिलं होतं. मी आणि सलीम खान बरोबर काम करु लागलो तेव्हा मी सलीम खान यांना अनेकदा सांगितलं होतं, की अमजद खान नावाचा एक चांगला मुलगा आहे, चांगलं काम करतो. आम्ही ते विसरलोही होतो. शोले सिनेमासाठी गब्बर म्हणून कुणाला घ्यायचं? यावर आम्ही विचार करु लागलो तेव्हा मला सलीम खान यांनी सुचवलं की तुम्ही एका मुलाची स्तुती करत होतात त्याला बोलवू. आता अमजद खानचं काम मी पाहिलं होतं. पण त्याचं नाव सलीम खान यांनी सुचवलं. तुम्हाला मी जे दोन प्रसंग सांगितले त्यावरुन आमचं ट्युनिंग कसं होतं ते तुम्हाला कळलं असेल”, असे सांगत गब्बरचा किस्सा त्यांनी सांगितला होता.
शोलेच्या सेटवरील कलाकारांचा फोटो (सौजन्य इंडियन एक्सप्रेस)
शोले हा चित्रपटसृष्टीतला ‘कल्ट क्लासिक’
शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतला असा चित्रपट आहे ज्याकडे ‘कल्ट क्लासिक’ म्हणून पाहिलं जातं. शोलेतले संवाद पाठ करणाऱ्या पिढ्या घडल्या आहेत. शोले नसांमध्ये भिनलेला प्रेक्षकही सिनेमागृहांनी पाहिला आहे. खरंतर चित्रपटात हिंसा आहे, त्याचा शेवट चांगला नाही म्हणून समीक्षकांनी सुरुवातीला हा चित्रपट आपल्या लेखणीने धोपटला होता. मात्र सलीम जावेद यांनी आणि जी.पी. सिप्पी यांनी एक निर्णय घेतला आणि सिनेमाचा शेवट बदलला. ज्यामुळे चित्रपट प्रचंड चालला. शोले पाहिला नाही असा भारतातला माणूस सापडणं आजही विरळाच आहे इतकी या चित्रपटाची जादू आजही भारतीय प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. १५ ऑगस्ट १९७५ ही या चित्रपटाची रिलिज डेट. चित्रपटाचं नाणं जितकं खणखणीत वाजतं आहे तितकंच या चित्रपटावरचं प्रेम वाढतं आहे. शोलेने मागची पाच दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शोले म्हणजे असा सिनेमा आहे ज्यात ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन सगळं आहे.
विश्वभारत News Website