न्यायालयीन परिसरात घटस्फोट घेतल्यानंतर सुनेने सासऱ्याच्या व पतीच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे दोन गटात न्यायालयाच्या आवारातच फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण काय?
पोखरी गावातील युवतीचा विवाह आडगाव भोंबे( ता. भोकरदन) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र त्यांच्यात आपसात पटत नव्हते. त्यामुळे ही विवाहिता माहेरी राहात होती. त्यानंतर नातेवाइकांनी एकत्र येऊन आपसात बैठक घेतली व फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता. दोन्हीकडील नातेवाईक मंगळवारी भोकरदन न्यायालयाच्या परिसरात आले व वकिलाशी चर्चा करून नोटरी करून त्यांनी आपसात फारकत घेतली. हे सर्व शांततेत पार पडले मात्र त्याच वेळी फारकत घेतलेल्या सुनेने पळत जाऊन सासरा विनायक साळवे यांच्या कानशिलात लगावली.
वडिलाच्या मदतीला धावून गेलेल्या शुभमला सुद्धा तिने मारहाण केली, त्यानंतर दोन्हीकडील मंडळी एकमेकांवर तुटून पडल्याने एकच गोंधळ उडाला. तेव्हा न्यायधीशांनी पोलिसांना पाठवले. सौम्य लाठीचार्ज करुन गोंधळ आवरण्यात आला.
विश्वभारत News Website