नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.
(बिबी ग्रा.पं.सदस्य नरेंद्र अल्ली यांची तहसीलदाराकडे मागणी.)
कोरपना ता.प्र.:-
कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनील रामचंद्र मुसळे यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता,शिवधुर्याची जागा न सोडता व कुठलीही शासकीय मोजणी न करता अतिक्रमण करून संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीटचे पोल उभे करून काटेरी तार लावण्याचे काम सुरू केले आहे.तातडीने हे काम थांबवून कारवाई करण्याची मागणी बिबी ग्रामपंचायतचे सदस्य नरेंद्र अल्ली यांनी कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलविल्याने भर वस्तीत पावसाळ्याचे पाणी शिरते.नांदा शेत शिवारातील जेनेकर यांची शेतजमीन जवळपास १५ वर्षांपूर्वी मुसळे यांनी विकत घेतली होती.मुसळे यांनी ही शेतजमीन घेण्यापूर्वी याच शेत जमिनीतील जवळपास २ एकर जमीन जेनेकर यांनी गुंठे पाडून परिसरातील नागरिकांना विकली.आजमितीला त्याठिकाणी जवळपास ६० कुटुंबांनी आपले पक्के घर बांधून वास्तव्य करीत आहे.जेनेकर यांच्या शेतात नैसर्गिक नाला असून परिसरातील पावसाचे व इतर पाणी याच नाल्यातून वाहते.अनील मुसळे यांनी खरेदी केलेल्या जमिनीला संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे.तसेच नैसर्गीक नाल्याचा प्रवाह बदलविला आहे.यासाठी यांनी शासनाची कोणतीही बांधकाम परवानगी घेतली नाही.
प्रा.अनील मुसळे यांची शेतजमीन ही बिबी गावाच्या सीमेलगत असून शिव धुर्याची जागा न सोडता हे काम करीत असल्याचे चित्र आहे.खरेदी केलेल्या शेत जमिनीतील काही जमीन अकृषक वापरात आहे.जेनेकर यांनी गुंठेवारी करून विकलेली जमीन अकृषक वापरात असून त्याठिकाणी मोठी वसती अस्तित्वात आहे.मुसळे यांच्या शेत जमिनीतील काही जमीन अकृषक वापरात आहे. याठिकाणचे सांडपाणी,पावसाचे पाणी, आवाजाहीचे रस्ते व इतर सोयीसुविधांसाठी मुसळे यांच्याद्वारे करण्यात येत असलेल्या पक्क्या बांधकामामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे.तसेच शिव धुर्याची जागा सोडली नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून सदर बांधकाम तातडीने थांबवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बिबी ग्रा.पं.सदस्य नरेंद्र अल्ली यांनी निवेदनाद्वारे केली आहे.उपविभागीय अधिकारी राजूरा, गटविकास अधिकारी पं.स.कोरपना,सहाय्यक संचालक नगर रचनाकार विभाग चंद्रपूर, सरपंच,सचिव बिबी व नांदा ग्रा.पं.यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
———————
“बिबी ग्रामपंचायतचे सर्व स्ट्रीट लाइट व बोरवेल सुद्धा तार कंपाऊंडच्या आत घेतली आहे.कोणत्याही प्रकारे मोजणी न करता अरेरावीने काम सुरू असल्यामुळे हे काम तात्काळ थांबविणे आवश्यक आहे.”
(नरेंद्र अल्ली,सदस्य ग्रा.पं.बिबी.)
———————–
“माझा शेत खुला होता आता मी कंपाऊंड करत आहो.पुर्वी लोक तेथे सामान,गाड्या वगैरा ठेवायचे,मला आता सोयाबीन पेरायची आहे.आज १४,१५ वर्षे झाली ती जागा खुलीच होती.त्यांचा म्हणणं पडला की,जागा खुली ठेवा पण कोण खुली ठेवणार तुम्हीच सांगा. माझ्याकडे जागेचा नमुना(क)प्रत आहे,रजिस्ट्री आहे.पुन्हा काही शंका वाटत असेल तर त्यांनी मोजमापासाठी घेऊन यावे,त्यांची जागा सरकली असेल तर आपण सोडायला तयार आहो आणि जर माझी असेल तर मी सोडणार नाही.यात काही वाद नाही मोजमाप करायला मी तयार आहो.” अशी प्रतिक्रिया प्रा.अनील मुसळे यांनी सदर प्रतिनिधीला दूरध्वनीवरून दिली.”