विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर तीन संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. एका पोलमध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक एक्झिट पोल्समध्ये अपक्ष व इतर पक्षांच्या आमदारांची संख्या २० ते ३० च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.
आघाडी व युती बहुमतापर्यंत पोहोचू शकली नाही तर दोन्ही बाजूचे पक्ष अपक्षांना व छोट्या पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करतील. या काळात बंडखोरांचा भाव वधारलेला दिसेल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षांमधील बंडखोर आहेत. त्यांच्या पक्षाकडून, युती किंवा आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे या उमेदवारांनी पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील सहाही प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही मतदारसंघांमध्ये मविआ व महायुतीच्या दोन-दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढती देखील होत आहेत.
राज्यात १५० हून अधिक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात
राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांमध्ये तब्बल २,०८६ अपक्ष आहेत. यामध्ये १५० हून अधिक मतदारसंघात बंडखोर रिंगणात आहेत. यापैकी ३५ बंडखोर उमेदवार असे आहेत जे निवडणूक जिंकू शकतात.
क्र. मतदारसंघ बंडखोर उमेदवार (पक्ष)
1 नांदगाव समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)
2 अक्कलकुवा हिना गावित (भाजपा)
3 कसबा कमल व्यवहारे (काँग्रेस)
4 पर्वती आबा बागुल (काँग्रेस)
5 कोपरी – पाचपाखाडी मनोज शिंदे (काँग्रेस)
6 कारंजा ययाती नाईक
7 शिवाजीनगर मनीष आनंद (काँग्रेस)
8 इंदापूर प्रवीण माने, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी)
9 पुरंदर दिगंबर दुर्गडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
10 मावळ बापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
11 जुन्नर आशा बुचके – भाजप
12 खेड आळंदी अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
13 भोर किरण दगडे पाटील, भाजप
14 मीरा रोड गीता जैन
15 सिंदखेड राजा गायत्री शिंगणे
16 बीड ज्योती मेटे (रासप)
17 सोलापूर शहर मध्य तौफिक शेख
18 श्रीवर्धन राजा ठाकूर
19 सावनेर अमोल देशमुख (काँग्रेस)
20 काटोल याज्ञवल्क्य जिचकार
21 रामटेक चंद्रपाल चौकसे
22 उमरेड प्रमोद घरडे
23 नागपूर पश्चिम नरेंद्र जिचकार
24 सोलापूर शहर उत्तर शोभा बनशेट्टी
25 श्रीगोंदा राहुल जगताप (सपा)
26 अहेरी अबरीश अत्राम (भाजपा)
27 विक्रमगड प्रकाश निकम
28 नाशिक मध्य हेमलता पाटील
29 मावळ बापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
30 जुन्नर आशा बुचके, भाजप
31 जुन्नर शरद सोनवणे, शिवसेना शिंदे गट
32 भोर किरण दगडे पाटील, भाजप
33 शिवाजीनगर मनीष आनंद
34 बडनेरा प्रिती बंड
35 पुरंदर संभाजी झेंडे
बंडखोरांचा मविआ व महायुतीलाही धसका
या ३५ बंडखोरांपैकी किती उमेदवार जिंकतात, या बंडखोरांचा कोणाला फटका बसणार, बंडखोरांमुळे त्यांच्या पक्षाचे (बंडखोरीआधी ते ज्या पक्षात होते) किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे किती उमेदवार पडतात याकडे सर्वाचं लक्षं लागलं आहे.