महसूल सहाय्यकाने डंपर मालकाकडून 55 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तहसीलदार बाई माने यांच्यासह दोन तलाठी आणि लिपीक, अशा चौघांना दिलासा मिळाला. वडूजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 27 जानेवारीपर्यंत त्यांना अटक करू नये, असा आदेश देत न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिले. ही घटना साताऱ्यातील खटावच्या तहसील कार्यालयात घडली होती.
तहसीलदारांसह चौघांची उच्च न्यायालयात धाव : डंपर मालकाकडून महसूल सहाय्यकानं 55 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खटावच्या तहसिलदार बाई माने यांच्यासह दोन तलाठी आणि एक लिपीक, अशा चौघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी वडूजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, 27 जानेवारीपर्यंत त्यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुद्दार यांनी दिला असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड. श्रीनिवास खराडे यांनी दिली.
नेमकी घटना काय? : खटाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण नांगरे याने डंपर मालकाकडून 55 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 21 नोव्हेंबर 2023 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक शितल जानवे-खराडे यांनी तपास करुन खटावच्या तहसीलदार बाई माने यांच्यासह औंधचे तलाठी धनंजय तडवळेकर, भोसरे गावचे तलाठी गणेश राजमाने आणि लिपीक रविंद्र कांबळे यांची नावं पुरवणी आरोपपत्रात दाखल केली होती.