विदर्भासह देशभरातील शेतकरी ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे, त्या मोसमी पावसाने अंदमान व निकोबार बेटासह अरबी समुद्राच्या काही भागांत अधिकृत प्रवेश केला आहे. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे लवकरच तो केरळमध्येही दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मोसमी पाऊस येत्या २६ मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञांचे म्हणणे काय?
दक्षिण अंदमान मध्ये मोसमी पाऊस पोहचला आहे, अशी घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात आनखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. मोसमी पाऊस पुढील दोन तीन दिवसात आग्नेय अरबी समुद्र आणि मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात पोहचू शकतो आणि केरळ किनारपट्टीवर २६ तारखेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती येथील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.
विदर्भात केव्हा पोहचणार?
विदर्भात पुढील चार दिवस (२१ मेपर्यंत) उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. अमरावती, नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक (एक दोन ) ठिकाणी हलक्या-फुलक्या पावसाची तसेच धुळवादळाची शक्यता आहे. २२ तारखेपासून विदर्भात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ तारखेपासून तापमान सुसह्य होईल अशी आशा असल्याचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.
साधारणपणे विदर्भात ७ जून ही मोसमी पावसाच्या आगमनाची तारीख आहे. मात्र, फारच कमी वेळा मॉन्सूनने तो मुहूर्त साधला आहे. कधी पहिल्या आठवड्यात, तर कधीकधी तर तिसऱ्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे याबाबत नेमकी तारीख सांगणे फारच अवघड असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आणि हवेच्या दिशेवर त्याची वाटचाल अवलंबून राहणार आहे. मार्गात ऐनवेळी काही अडथळे न आल्यास १० जूननंतर मोसमी पाऊस विदर्भात प्रवेश करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण अल निनोमुळे पावसाळ्यात खंड पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात केव्हा?
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मोसमी पावसाची सध्याची वाटचाल पाहता हवामानाची स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
विश्वभारत News Website