वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-
आर्वी – गणेशोत्सवाकरिता प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे आर्वी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. काही वर्षाआधी सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणे प्रा प्रशांत सव्वालाखे यांच्या घरचा गणपती प्रसिद्ध होता विज्ञानावर आधारित प्रयोगाद्वारे अंधश्रद्धा, हुंडा, शिक्षण, बालविवाह, पर्यावरण, प्रदूषण आदी विषयावर सामाजिक देखावे निर्माण करून जनजागृती केली जात होती शहरात सव्वालाखे यांच्या गणपतीची उत्सुकता असायची. श्री तेलंगराय महाराज मंदिराचा मानाचा गणपती, गांधी चौक, शिवाजी चौक, पद्मावती चौक, इंदिरा चौक, पुरुशुमल चौक, सिंधी कॅम्प, बस स्टँड चौक, कसबा, दाताळकर, करमरकर, सेवक इत्यादी ठिकाणचे गणेश मंडळ देखाव्याकरिता प्रसिध्द होते.
आता मोजकीच मोठी गणेश मंडळे राहिल्याने भाविकांना देखील देखावे, आरास बघण्यास उत्साह नाही. काही वर्षांपूर्वी आर्वी परिसरातील गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख होती. गणेशोत्सव साजरा करताना मंडळांमध्ये स्पर्धा लागत असल्याने सुंदर आरास, देखावे उभारले जात होते. गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूकदेखील मध्यरात्री उशिरापर्यंत राहात होती. तर गणेशोत्सवात सायंकाळपासून भाविक देखावे-आरास बघण्यासाठी येत असल्याने रस्ते भाविकांनी फुलून जात होते. आर्वीला आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविकदेखील सहकुटुंब दर्शनासाठी येत असल्याने दहा दिवसांत भारावलेले मंगलमय वातावरण राहात होते.
मात्र गेल्या काही वर्षांत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या झपाट्याने रोडावली गेली. काही मंडळे जागेअभावी बंद झाली तर काही मंडळांचे कार्यकर्ते कामधंदा, संसाराला लागल्याने हळूहळू त्या मंडळांची आरास कमी प्रमाणात होत ती मंडळे बंद झाली. गणेशोत्सवात प्रशासनाच्या जाचक अटी केल्याने काही मंडळांनी विविध कारणास्तव गणेशोत्सव साजरा करणे बंद केले. त्यामुळे यंदाच्या वर्षी हातावर मोजण्या इतकीच मोठी मंडळे राहिली आहेत.
वर्गणी मागायला कार्यकर्ते जाण्यास तयार नाही, वेळ नाही, रहिवासी-व्यापाऱ्यांकडून वर्गणीचा सढळ हात आखुड झाला, भाडेतत्त्वावर मिळणारे देखावे महाग झाले, शहरात देखावे साकारणारे कारागीर, मूर्तिकारांची संख्या रोडावली, रहिवासी, भाविकांचा उत्साह कमी झाला तसेच प्रचंड मेहनतीने देखावा केल्यावर पहायला, कौतुकाची थाप, प्रोत्साहन द्यायला भाविकांची गर्दी होत नाही म्हणून आर्वीच्या गणेशोत्सवातील देखावे दिसेनासे झाल्याची खंत नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे यांनी व्यक्त केली.