शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा
* शेतकरी संघटनेची मागणी
चंद्रपूर – सरकारने शेतकर्यांची सध्याची निकड व आर्थिक स्थिती लक्षात घेता तसेच पुढील हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने तातडीने धानाचे चुकारे व बोनस देण्याची मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पणन संचालक व पणन सचिव यांचेकडे केली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभुत भावाने, जो राज्यातील हमी भाव आहे त्यावर पाचशे रुपये बोनस देऊन शासनाने मार्केटिंग फेडरेशन मार्फत आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर ( TDC आदिवासी विकास महामंडळाची खरेदी सुरू असलेला भाग वगळून )चालू हंगामात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन द्वारे धानाची खरेदी चालू हंगामात केली आहे.
वीस दिवसानंतर रोहिणी नक्षत्रानंतर धानाचा खरीपचा हंगाम सुरू होणार आहे. कोरोना व लॉकडाऊन मुळे आधीच शेतकरी त्रस्त आहे आणि पुढील हंगामाकरिता दुर्गम भागात बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस शासनाने अजून पर्यंत चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात वाटप न केल्यामुळे धान उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. या सर्व बाबी विचारात घेता शासनाने मार्केटिंग फेडरेशन मार्फत चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व 500 रुपये प्रतिक्विंटल बोनस शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तातडीने वाटप करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप,प्रभाकर दिवे,अरुण नवले,राजेंद्रसिंह ठाकूर,अरुण पाटील मुनघाटे,शालिक नाकाडे,राजू पाटील जक्कनवार,प्रा.ज्योत्स्ना मोहितकर,पौर्णिमा निरांजने, अँड. श्रीनिवास मुसळे, नीलकंठ कोरांगे,सुधीर सातपुते, अँड.शरद कारेकर, प्रा.निळकंठ गौरकार,तुकेश वानोडे,डॉ.संजय लोहे,दादाराव नवलाखे, रघुनाथराव सहारे,दिनकर डोहे, प्रा.रामभाऊ पारखी,धिसू पाटील खुणे,सुभाष खानोरकर इत्यादींनी राज्याचे पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील, पणन संचालक व पणन सचिव यांच्याकडे केली आहे.