पारंपरिक शेती आणि आश्चर्यकारक फायदे

पारंपरिक शेती आणि आश्चर्यकारक फायदे
गाय ही आपल्या सगळ्यांसाठी मातेसमान आहे. गाईच्या शेणात, गाईच्या दुधात, गाईच्या मूत्रात जी शक्ती आहे, ती अन्य कशातही नाही. गोमूत्र तर मनुष्यासाठी उपकारक ठरले आहे. गोमूत्राचा औषधी उपयोग केला जात असून, त्यापासून अनेक असाध्य आजार बरे होत आहेत. असा अनुभव असंख्य लोकांनी घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गोमूत्रासंदर्भात अनेक वेळा अनेक प्रकारचे संशोधन करण्यात आले आणि गोमूत्राचा अर्क या देशातील नागरिकांसाठी किती उपयुक्त आहे, हे नुसतेच पटवून देण्यात आले असे नव्हे, तर ते सिद्धही करून देण्यात यश मिळाले आहे. दूध, गोमूत्र आणि शेण या गाईपासून मिळणा-या गोष्टी मानवी जीवनाला कलाटणी देणा-या आणि ग्रामीण जीवनाला उभारी देणा-या असल्याने गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच गाईची हत्या केली जाऊ नये, गोमांस कुणी खाऊ नये, असा आग्रह सातत्याने धरला जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून असा आग्रह धरला जात असल्याने त्याला छेद देण्यासाठी स्वत:ला पुरोगामी म्हणविणारी या देशातली एक ढोंगी जमात मुद्दाम ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करून भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहे.
गाय आणि म्हैस यांच्या शेणात ग्रामीण भारताचे भाग्य बदलविण्याची ताकद आहे. शेतीला लाभकारी व्यवसाय बनविण्याची आणि ग्रामीण भारत प्रदूषणमुक्त करण्याची क्षमताही या शेणात आहे. शेतांमध्ये शेणखत टाकण्यात आले आणि मातीची उर्वरा शक्ती वाढविण्यासाठी शिदोडांचा वापर करण्यात आला तर अतिरासायनिक खतांच्या वापरामुळे थकलेल्या वसुंधरेला नवजीवन प्राप्त होऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. जर का जमिनीचा पोत सुधारला नाही, रासायनिक खतांच्या मा-यामुळे जमीन नापिकीच्या दिशेने वळली तर सगळ्यांसोबतच स्वत:ला पुरोगामी म्हणत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करणा-यांचेही मरण अटळ आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आज आपण आधुनिक पद्धतीने शेती करीत आहोत. रासायनिक खतांचा प्रचंड मारा आणि कीटकनाशकांची फवारणी यामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे, म्हणूनच जमिनीला दिलासा देण्यासाठी आपण सगळ्यांनीच मागे वळून बघण्याची गरज आहे.
आज अनेक देशांमधल्या शेतक-यांनी भारतातल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती करून अतिशय आश्चर्यकारक फायदे मिळविले आहेत. भारतात कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता असे जेव्हा आम्ही ऐकतो, तेव्हा असे वाटते की, भारतात सोन्याचा प्रचंड साठा होता आणि तो परकीयांनी लुटून नेला. सोन्याचा धूर निघत होता, याचा अर्थ भारतात मोठ्या प्रमाणात समृद्धी होती. आपली जी शेती होती ती सोन्यापेक्षाही अधिक किमती होती. कारण, शेतीमध्ये आम्ही शेणखत टाकत होतो. त्यामुळे मातीची सुपीकता वाढत होती आणि आरोग्याला पोषक असे प्रचंड धान्योत्पादन होत असे. पण, ज्यापासून आम्ही खत बनवत होतो, ते शेण (एका अर्थाने सोने) आज एक तर चुलींमध्ये जळत आहे वा त्याकडे आमचे दुर्लक्ष होत आहे. आम्ही अजूनही रासायनिक खतांचा मारा करून जमिनीचा कस कमी करीत आहोत. आमची वसुंधरा निरोगी राहण्याऐवजी आजारी होत चालली आहे, ती थकत चालली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ करताना शेणाचे महत्त्व विशद केल्याचे आपणास स्मरत असेलच. शेणाचा सदुपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. शेणापासून खत तर तयार होईलच; गॅसही तयार करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कचरा आणि शेण या गोष्टींना नागरिकांनी उत्पन्नाचे एक साधन बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे आवाहन जर आम्ही गांभीर्याने घेतले तर आमचे जीवन समृद्ध होऊ शकते, यात शंका नाही. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या एका अर्थसंकल्पात ‘गोबरधन’  योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेंतर्गत गोबर गॅस आणि जैविक खत तयार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीमध्ये रासायनिक खते वापरल्याने जमिनीचा कस कमी होऊन वाळवंटात रूपांतर होण्याचा धोका तर आहेच. रासायनिक खते ही खरे तर खलनायकाची भूमिका बजावत आहेत आणि या खलनायकाकडून झालेल्या छळामुळे दक्षिणेकडील अनेक राज्यांमधील शेतकरी आत्महत्याही करीत आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापराचा परिणाम तुमच्या-माझ्या आरोग्यावरही होत आहे, हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. रासायनिक शेतीतून जी उत्पादनं होत आहेत, ती विषासारखी आहेत. अन्नधान्य आणि भाज्यांमधून रासायनिक द्रव्ये आपल्या शरीरात जात असल्याने कर्करोगासारख्या असाध्य रोगांनीही आपल्या जीवनाला विळखा घातला आहे. रासायनिक खते वापरल्याने पहिली काही वर्षे तर भरपूर उत्पादन होते. पण, काही वर्षांनी ही जमीन वाळवंट होण्याचा धोका निर्माण होतो. मातीचा वरचा जो एक इंचाचा थर आहे तो एकदम सुपीक असायला हवा आणि तो तयार होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. परंतु, रासायनिक खतांच्या वापरामुळे हा वरचा थर बिनकामी होण्यास फार काळ लागत नाही. १५-१६ वर्षांत हा थर नष्ट होतो. उर्वरकांच्या वापरामुळे माती निर्जीव आणि कोरडी होत चालली आहे.
आपण आपल्याला आजार झाला तर स्वत:वर उपचार करतो. तशाच उपचारांची गरज शेतजमिनीलाही आहे. पण, त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. शेतजमिनीत जीव ओतायचा असेल तर रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. गाई-म्हशींचे शेण आणि पालापाचोळा एकत्र करून सेंद्रिय खत तयार केले जाऊ शकते. आपल्या आसपासचा सगळा कोरडा कचरा (प्लॅस्टिक सोडून) याकामी वापरू शकतो. सेंद्रिय खत जर मातीत मिसळले तर मातीचा गुणधर्म एकदम बदलतो. मातीतला कोरडेपणा जाऊन तिथे ओलावा निर्माण होतो आणि या ओलाव्यामुळे जमिनीची धूपही थांबते. याउलट रासायनिक खतांचे आहे. रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असल्याने आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने जमिनीत नैसर्गिकरीत्याच जे पोटॅशियम असते, त्याचे क्षरण गतीने होते. अशा स्थितीत पोटॅशियमची मात्रा भरून काढण्यासाठी जेव्हा आम्ही पोटॅशचा वापर करतो, तेव्हा पिकांमधील अ‍ॅस्कॉरलिक अ‍ॅसिड अर्थात, व्हिटॅमिन सी आणि कॅरोटिन कमी होते. त्याचप्रमाणे आम्ही जे सुपरफॉस्फेट वापरतो, त्यामुळे मातीत असलेले तांबे आणि जस्त यांचे प्रमाणही कमी होते. जस्त कमी झाल्यामुळे शरीराच्या वाढीवर परिणाम होतो, लैंगिक विकास मंदावतो. शिवाय, शरीरावर जखम असेल तर ती भरून येण्यासही विलंब लागतो. ज्या जमिनीत नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटॅश टाकले जाते, त्या शेतजमिनीवर पेरलेल्या गव्हात आणि मक्यात प्रोटिन्सचे प्रमाण २० ते २५ टक्के कमी होते, अशी जी माहिती आहे, ती खरी असेल तर हा धोका वेळीच ओळखून पावलं उचलण्याची गरज आहे.
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणी प्रदूूषित होत आहे आणि ते प्यायल्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार वाढत आहेत. भूगर्भातील पाणी कीटकनाशकांमुळे दूषित होऊ नये यासाठी अजून तरी कुठलीही यंत्रणा विकसित झालेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या भूतलावर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. जलसाठे कमी होत असताना एकमात्र आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे भूगर्भातील पाणी. पण, हे पाणीही जर आम्ही जाणीवपूर्वक प्रदूषित करणार असू, तर ईश्वरही आम्हाला माफ करणार नाही. न्यूझीलंडसारख्या विकसित देशातही आज जैविक शेतीवर भर दिला जात आहे. तिथल्या लोकसंख्येचा मोठा भाग आज गाय, म्हैस यासारख्या पशुपालनावरच उदरनिर्वाह करतो. प्रगत देशात जर जैविक शेती केली जात असेल आणि ही बाब त्यांनी भारताकडूनच शिकली असेल तर भारतीयांनी त्याकडे पाठ का फिरवावी? रासायनिक खतांच्या वापराने पर्यावरण वाचविण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे, ही बाबही दुर्लक्षित करून चालायची नाही. एकच उदाहरण आपण लक्षात घेतले तर परिस्थितीचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. एक टन युरिया तयार करण्यासाठी पाच टन कोळसा जाळावा लागत असेल तर उद्या काय परिस्थिती निर्माण होईल, याची कल्पनाही करवत नाही.
आज आपल्या देशात किमान बारा ते तेरा कोटी गाई-म्हशी आहेत. या गाई-म्हशींपासून वर्षभरात किमान १२० कोटी टन एवढे शेण उपलब्ध होते, असा एक अंदाज आहे. या १२० कोटी टनांपैकी अर्धे शेण हे स्वयंपाक करण्यासाठी चुलीत गोव-यांच्या रूपात जाळले जाते. वास्तविक, गोव-या जाळल्याने जी उष्णता मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि त्यामुळे अन्न शिजवायलाही वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता गोव-या तर चुलीत जाळायलाच नको. काही वर्षांआधी गोव-या चुलीत जाळणे बेकायदेशीर ठरवण्यात आले होते. पण, कुठेही कुणावर कारवाई झाल्याचे स्मरणात नाही. शेणाच्या गोव-या थापण्याऐवजी त्याचे खत तयार करावे, ते शेतीतल्या मातीत मिसळावे. असे केल्याने रासायनिक खतांवर होणारा खर्चही टाळता येईल, जमिनीची गुणवत्ताही वाढविता येईल. आपण जे अन्नधान्य खातो, ते रसायनेमुक्त होईल आणि त्यामुळे कर्करोगासारखे जे गंभीर आजार आहेत, त्याचे प्रमाणही कमी होईल. आता गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची. आपले हित नेमके कशात आहे, हे ओळखून आपण निर्णय घेतले तर आपले आणि आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित होईल.

About Vishwbharat

Check Also

जुन्नारदेव के पालाचोरई में पहली बार मोती की पैदावार का हुआ शुभारंभ

जुन्नारदेव के पालाचोरई में पहली बार मोती की पैदावार का हुआ शुभारंभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

भरदिवसा धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला : दोघे…!

बिबट्याचा संचार वाढला आहे. जेमतेम काही दिवसांच्या कालावधीतच बिबट्याने चौघांवर हल्ले करून गंभीर जखमी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *