हवामान अंदाज…पुढील पाच दिवस पावसाचे
पुणे-
पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येणाऱ्या 24 तासांत कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाले आहे. तसेच उत्तर कर्नाटकचा काही अंतर्गत भाग ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
आगामी पाच दिवस हे मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेने दिला आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे. पाऊस आणि गारपिटीने अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकांचं नुकसान झाले आहे. मुंबई शहर आणि उपगनरांमध्ये आतापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान 36 अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे.
यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.