‘लोकराज्य’चा अंक प्रकाशित
मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा जून महिन्याचा ‘समृध्द शेती’ कृषी विशेषांक प्रकाशित झाला आहे. खरीप हंगामाचे औचित्य साधून खरीप हंगामासाठी राज्य शासनाने केलेली तयारी, शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचा प्रामुख्याने समावेश या अंकात करण्यात आला आहे.
‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक उन्नती साधली आहे, अशा निवडक शेतकऱ्यांच्या यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर कृषी अवजारे, कृषी पर्यटन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या कार्याची ओळख, कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, शिवभोजन थाळीची सार्थकता, महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय आदींचा या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे. हा अंक https://mahasamvad.in या संकेतस्थळावर ऑनलाइन मोफत उपलब्ध आहे.