विश्व भारत ऑनलाईन:
‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’, असे कविता संग्रह लिहिणारे आणि ज्येष्ठ गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य निलकांत ढोले (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. शनिवारी पहाटे नागपुरातील हिंगणा मार्गावरील साईनगर येथे त्यांचे निधन झाले. ‘वेदनांची वेधशाळा’ हा त्यांचा गझलसंग्रह व ‘सोहळे ऋतूंचे’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले.
निलकांत ढोले यांच्या ‘अग्निबन’ ह्या संग्रहाला ‘सोव्हिएट लॅण्ड नेहरू अवार्ड’ ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याला कविवर्य वामन इंगळे यांची प्रस्तावना लाभली होती. ‘कळा काळजाच्या’ ह्या संग्रहास गझलसम्राट स्व. सुरेश भट आणि प्राचार्य राम शेवाळकर यांनी प्रदीर्घ प्रस्तावनेसह अभिप्राय देऊन भरपूर कौतुक केले होते.
रचना मुक्तछंदामध्ये
सुरेश भटांना ते गुरू मानत. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने निलकांत ढोले यांची गझल बहरत गेली. त्यांचा काव्यपिंड मूलतः गेय आणि वृत्तबद्ध कवितांवर पोसला गेल्यामुळे लयबद्ध रचना निर्मितीकडे त्यांचा कल अधिक असणे हे स्वाभाविकच होते. ‘अग्निबन’ या संग्रहात त्यांच्या बऱ्याच रचना मुक्तछंदामध्ये आहेत.
अनेक ठिकाणी लेखन
अनेक वृत्तपत्रांमधे त्यांनी लेखन केले आहे. नागपूर आकाशवाणी, दुरदर्शनवरही त्यांचे काव्य प्रसारित झाले आहे. 1986 साली नागपूर दूरदर्शनवर राम शेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वैदर्भीय कविसंमेलनात त्यांच्या गझलेला प्रसिद्धी मिळाली.
कार्यक्रमात सहभाग
विदर्भ साहित्य संमेलने, जनसाहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, बहुजनवादी साहित्य संमेलन, गजल सागर प्रतिष्ठान, मुंबईद्वारा आयोजित गझल संमेलने, नागपूर उत्सवांतर्गत कविसंमेलन, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.
कविता ठरली रसिकप्रिय
नीलकांत ढोले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, दलित साहित्य अकादमी सन्मान, तसेच जागतिक मराठी समेलनांतर्गत कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ‘जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो’ ही त्यांची कविता रसिकप्रिय ठरली.