PM मोदीने चीनला सुनावले

भारत आणि चीनचे संबंध सुधारण्यासाठी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित गरजेची आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना केले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोघांची ओझरती भेट झाली. यावेळी अधिकारीस्तरावर सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चाची व्याप्ती वाढविण्यावर दोघांचे एकमत झाल्याचे परराष्ट्र सचिव विनय ख्वात्रा यांनी सांगितले.

जोहान्सबर्गमध्ये पंतप्रधानांची जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली नाही. पत्रकार परिषदेपूर्वी दोघांची ओझरती भेट आणि अत्यंत थोडक्यात चर्चा झाल्याचे ख्वात्रा म्हणाले. सीमाभागामध्ये शांतता राहणे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर केला जाणे हे भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या पार्श्वभूमीवर सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या लष्करी अधिकारी स्तरावरील चर्चाची तीव्रता वाढविण्याचे आदेश आपापल्या अधिकाऱ्यांना देण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविल्याचे ख्वात्रा यांनी स्पष्ट केले. मे २०२०मध्ये लडाख सीमेवर चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे मोठा संघर्ष उफाळला होता. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

तणाव कमी करण्यासाठी आतापर्यंत लष्करी अधिकारी स्तरावर १९ बैठका झाल्या असल्या तरी त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. सप्टेंबर २०२२मध्ये बालीमध्ये झालेल्या मोदी-जिनपिंग भेटीवेळी दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भारताकडून सांगण्यात आले होते. मात्र गेल्या महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्या भेटीत लडाखचा विषय चर्चिला गेल्याचे सांगितल्यामुळे भारताच्या परराष्ट्र खात्यालाही तसे निवेदन जारी करावे लागले होते. यावेळी मात्र भेट झाल्याच्या दिवशीच परराष्ट्र सचिवांनी चर्चेचा तपशील जाहीर केला आहे. गुरूवारच्या भेटीबाबत चीनकडून अद्याप अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही.

पुढील भेट दिल्लीमध्ये
गतवर्षी सप्टेंबरमध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेमध्ये मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमध्ये लडाखमधील तणावावर चर्चा झाल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये झालेल्या भेटीतही दोन्ही नेत्यांनी यावर चर्चा केली. पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या परिषदेस जिनपिंग उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यापूर्वी लडाखमधील तणाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

About विश्व भारत

Check Also

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी?

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी? टेकचंद्र सनोडिया …

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *