नाना पटोले यांनी BJP च्या प्रवाह विरोधात जाणे पसंद केले. 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नाना पटोले यांनी अचानक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला धक्का दिला होता. 2009 ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. नाना पटोले यांनी त्यावेळी 2 लाख मते घेतली होती. तर, भाजप उमेदवाराने अवघी 1 लाख मते घेतली होती. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी साडे चार लाख मते घेत विजय मिळविला होता. पुढील निवडणुकीत म्हणजेच 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून तिकीट मिळविले आणि ते जिंकूनही आले होते.
2014 ला पटोले यांनी गोंदिया भंडारा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांचा त्यांनी जवळपास दीड लाखांनी पराभव केला. 2018 त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2019 मध्ये ते साकोली विधानसभेतून निवडून आले. ठाकरे सरकारच्या काळात त्यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र, अकरा महिन्यातच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेस हायकमांडने त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष ही जबाबदारी सोपविली.
भंडारा – गोंदिया हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपालाच जाण्याची मोठी शक्यता आहे. कारण आता इथे भाजपचे सुनील मेंढे खासदार आहेत. तर, महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस वाट्याला येईल. भाजपकडून या जागेसाठी विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके ही दोन नावे चर्चेत आहेत. तर, काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी दुसऱ्या टर्मसाठी इच्छा व्यक्त केलीय. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये लहान मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावून ते जनसंपर्क वाढवत आहेत. मतदार संघातील विविध विकास कामांनाही त्यांनी गती दिलीय. तर, भाजपचेच आणखी एक इच्छुक उमेदवार परिणय फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांनीही आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी हे निवासस्थान बनवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केलीय.
कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार नाना पटोले यांचा तर हा गृह जिल्हा. पक्षाने आदेश दिल्यास गोंदिया भंडारा लोकसभा लढवू असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा काही लपून राहिली नाही असा अर्थ निघत आहे. पण, येथे जर महायुतीला आव्हान द्यायचे असेल तर नाना पटोले यांच्यासारखा तगडा उमेदवार असणे हे ही गरजेचे आहे. मात्र, ही निवडणूक नाना पटोले यांच्यासाठीही इतकी सोपी नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.
भंडारा गोंदिया लोकसभेत तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोरा, गोंदिया असे सहा मतदारसंघ येतात. त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस 2, कॉंग्रेस 1, भाजप 1, अपक्ष 2 आमदार आहेत. साकोली हा नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे. याच मतदार संघातून त्यांनी भाजपचे इच्छुक उमेदवार परिणय फुके यांचा पराभव केला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये नाना पटोले यांचा कस लागणार आहे. तर, साकोलीचे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नावाची चर्चा आहे. पण, काँग्रेस आणि वंचितने त्यांच्या नावाला सहमती दर्शविली नसल्याचे समजते.