मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या विविध उपाययोजनांनंतरही शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह पुन्हा एकदा दिसून आला असून ग्रामीण भागातील मतदारांच्या उत्साहामुळे राज्यात सरासरी ६० -६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात चांगले मतदान झाले होते. तर शहरी भागात मतदारांमधील निरुत्साह दिसून आला होता. त्यानंतर शहरी भागातील विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयोगाने जनजागृतीसह विविध उपायोजना केल्या होत्या. मात्र आयोगाच्या या उपाययोजनानंतरही मतदानच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. राज्यातील अकोला, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक आदी जिह्यांतील काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. शेवटच्या दोन तासांत मतदानाने वेग घेतला. त्यामुळे हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.
बीडमध्ये मतदान केंद्रात तोडफोड
बीड जिल्हयातील परळी विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
गडचिरोलीत सर्वाधिक
ग्रामीण भागातील मतदारांनी या वेळीही उत्साहात मतदान केले असून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले असून त्या खालोखाल कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सांगली, वर्धा, यवतमाळ, सातारा जिह्यात सरासरी ६५ ते ७० टक्के दरम्यान मतदान झाले आहे. तर ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, नांदेड, नागपूर, अकोला जिल्ह्यात ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.
अपक्ष उमेदवाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे (४०) यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराने मृत्यू झाला. शिंदे सकाळी छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रांवर आले असताना त्यांना भोवळ आली. त्यांना आधी शहरातील आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.