काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या आयातशुल्कामुळे दोन्ही देशांतील व्यापारावरील चर्चा रखडली होती. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी सतत भारताविरोधात विधाने करत होते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी चीनचा दौरा करत पुतिन आणि जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांचे सूर बदलले. मागच्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र राहतील, असे म्हटले होते. त्यानंतर आज पहाटे केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी भारत-अमेरिकेदरम्यानची व्यापार चर्चा पुन्हा सुरू होईल, असे संकेत दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे) ट्रुथ सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी मी उत्सुक असून पुढील आठवड्यात आमची चर्चा होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांमधील व्यापारी अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवणार आहे. माझे खूप चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी येत्या आठवड्यात बोलण्यासाठी मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की, या दोन्ही महान देशांना निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
आयातशुल्क लादल्यानंतर निर्माण झाला होता तणाव
६ ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले होते. रशियाकडून कच्चे तेल आयात करत असल्यामुळे दंड म्हणून हे शुल्क लादले गेले होते. त्यानंतर बरोबर एका महिन्याने म्हणजे ६ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा भारताबाबत सकारात्मक टिप्पणी केली. मागच्या आठवड्यात ओव्हल ऑफिसमध्ये बोलत असताना ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेत विशेष संबंध असल्याचे म्हटले होते.
ट्रम्प यांच्या टिप्पणीनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या टिप्पणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल, असे संकेत मिळाले होते.
एससीओ परिषदेचा परिणाम?
ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची परिषद संपन्न झाली होती. पंतप्रधान मोदींनी गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच सात वर्षांनी चीनचा दौरा केला होता. यावेळी व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी एकत्र आलेले पाहायला मिळाले. यानंतर ट्रम्प यांनी भारत आणि चीन जवळ आल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
त्यानंतर त्यांनी भारताबाबतची आपली भूमिका मवाळ केल्याचे दिसून आले.