मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री व काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी राज्यभरातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे (आरएसएस) कार्यक्रम आयोजित करण्यावर तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी ४ ऑक्टोबर रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की सरकारी शाळा व महाविद्यालयांमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमांसाठी परवानी देऊ नये. तसेच खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे विनंती केली आहे की सार्वजनिक उद्यानं व धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालावी.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खर्गे यांनी म्हटलं आहे की “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक संस्था सरकारी शाळा व सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनं आयोजित करते, या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात. यामुळे मुलांच्या मनात नकारात्मक विचारांची पेरणी केली जात आहे. काठ्या घेऊन प्रचारफेऱ्या काढल्या जातात. यामुळे निरागस मुलं आणि तरुणांची मानसिकता नकारात्मक बनत आहे.”
शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवर RSS च्या कार्यक्रमांवर बंधी घालावी : खर्गे
प्रियांक खर्गे म्हणाले, “शासकीय शाळा, सरकारमान्यताप्राप्त शाळा व सार्वजनिक ठिकाणी आरएसएशकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनांवर जसे की त्यांच्या शाखा, बैठका, सांघिक व परेडवर पूर्णपणे बंदी घालावी.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने केंद्र सरकारने विशेष नाणी आणि पोस्टल स्टॅम्प्स जारी केले आहेत. आरएसएसच्या वर्धापनदिनाच्या आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाले होते. संघाच्या मंचावरून मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेत्याने कर्नाटकमध्ये सरकारी ठिकाणी काँग्रेसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सावरकरांच्या कथित पेन्शनचा उल्लेख करत काँग्रेसची टीका
सरकारने संघाशी संबंधित नाणी व पोस्टल स्टॅम्प्स जारी केल्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजपावर टीका केली होती. खेरा म्हणाले, “आरएसएससाठी चलनी नाणी जारी करायची असती तर ६० रुपये किमतीची नाणी तयार करावी लागली असती, कारण ब्रिटिशांकडून विनायक दामोदर सावरकर यांना ६० रुपये इतकी पेन्शन मिळत होती. या लोकांनी (भाजपा सरकार) अशी कितीही नाणी व स्टॅम्प्स जारी केले किंवा शालेय अभ्यासक्रमात आरएसएसचा समावेश केला तरी हा देश महात्मा गांधींचा होता, आहे आणि राहील.”