सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीकडून विरोध केला जातो आहे. त्यापार्श्वभूमीवर या समितीकडून उद्या २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरकारकडूनही सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भारत बंदला दलित संघटनाचं समर्थन
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या बंदला जवळपास सर्वच दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय काही राजकीय पक्षाही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षानेही या बंदला समर्थन दिलं आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात
या बंदच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य हिंसाचार लक्षात घेता, केंद्र सरकारने राज्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे. यादरम्यान कुठेही हिंसाचार घडू नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना हायअर्लटवर ठेवण्यात आलं आहे.
भारत बंदचं कारण काय?
सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी आरक्षणात क्रिमी लेयर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्याला खरंच त्याची गरज आहे, त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी, यासाठी हा निर्णय देण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. दलित संघटनांकडून या निर्णयाला विरोध केला जातो आहे. हा एकप्रकारे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. याविरोधात संघटनांकडून उद्या मंगळवारी २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
काय सुरू, काय बंद?
महत्त्वाचे म्हणजे भारत बंद संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाही. मात्र, यादरम्यान, रुग्णालयं आणि औषधींची दुकाने यासारख्या आपातकालिन सेवा सुरु राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय बॅंक, सरकारी कार्यालये, शाळाही सुरु राहणार असल्याचही सांगण्यात येत आहे.