भाजप आमदार समीर मेघेंची हॅटट्रिक रमेश बंग रोखणार ?

दोन वेळा हिंगणा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे समीर मेघे विजयाची हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रमेश बंग त्यांना रोखणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

 

हिंगणा विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला. जुन्या कळमेश्वर मतदारसंघातून नागपूरच्या सीमेवर वसलेले हिंगणा औद्योगिक क्षेत्र. नीलडोह, डिगडोह, वानाडोंगरी सारख्या कामगारांच्या वस्त्या, वाडी, दत्तवाडी आणि पंचतारांकित एमआयडीसीचा दर्जा असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत या शहरी परिसरासह काही प्रमाणात ग्रामीण भागाचा या मतदारसंघात समावेश आहे. २००९ पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. २००९ मध्ये विजय घोडमारे येथून विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये समीर मेघे येथून विजयी झाले. मतदारसंघात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (ठाकरे), बसपा या पक्षांसह इतरही काही राजकीय पक्ष सक्रिय आहेत. जातीय समीकरणांचा विचार केल्यास हिंगणा मतदारसंघ ओबीसीबहुल आहे. दलित मतांची संख्या निर्णायक आहे. बसपाचे डॉ. देवेंद्र कैकाडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिरुद्ध शेवाळे यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही मेघे विरुद्ध बंग यांच्यात आहे. दलित मतांच्या विभाजनावर या मतदारसंघाचे जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.

 

राजकीय स्थिती

विद्यमान आमदार समीर मेघे यांनी उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या भाजप नेत्यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे केली. गडकरी, फडणवीस या दोन्ही नेत्यांनी हिंगणा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रमेश बंग या भागातून दोन वेळा निवडून गेले आहेत. त्यांना हा संपूर्ण मतदारसंघ परिचित आहे. मुलगा जिल्हा परिषद सदस्य आहे. सहकार क्षेत्रात बंग यांचे कार्य आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. या भागात काँग्रेसचेही उत्तम नेटवर्क आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला घसघशीत आघाडी मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला होता. काँग्रेस नेते सुनील केदार यांनीही नुकतीच बंग यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

 

मतदारसंघाची परिस्थिती

हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये समप्रमाणात शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. हिंगणा आणि बुटीबोरी या नागपूरजवळच्या दोन महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती मतदारसंघात येत असल्याने इथे कामगारांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. यात मराठी आणि हिंदी भाषिक कामगार समप्रमाणात असल्याने, भाषिकदृष्ट्या हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. मतदारसंघाचा एक भाग ग्रामीण असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या ही लक्षणीय आहे. तसेच नागपूरच्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांच्या शैक्षणिक संस्था हिंगणा मतदारसंघात असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारीवर्गाची लक्षणीय संख्या या मतदारसंघात आहे.

 

मतदारसंघाचे स्वरूप

हिंगणा मतदारसंघात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मतदारसंघात दोन मोठ्या औद्योगिक वसाहती असूनही परिसराचा अपेक्षित विकास झालेला नाही. हिंगणा औद्योगिक वसाहतीत रोजगार निर्माण करेल असा एकही मोठा उद्योग नव्याने आला नाही. मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. शिवाय जे उद्योग या औद्योगिक वसाहतीत सुरू आहेत त्यात भूमिपुत्र आणि बाहेरून येऊन स्थायिक झालेले मजूर असा वाद कायम आहे. हिंगणा मतदारसंघाच्या परिसरात अनेक नेत्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था असल्याने उच्चशिक्षित तरुणांची रेलचेल या परिसरात दिसून येते, मात्र त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना सामावून घेऊ शकणारे दर्जेदार उद्योग व्यवसाय इथे नसल्याने विकासाचा असमतोल स्पष्ट जाणवतो. तसंच पट्टे वाटपाचा प्रलंबित असलेला प्रश्न, ग्रामीण विकासाच्या आड येणारा झुडपी जंगलाचा प्रश्न, वेणा नदीकाठच्या गावांना पुरापासून संरक्षण देण्याची मागणी, इसासनी-बोखारा-गोधनी या निमशहरी भागात आजही किमान नागरी सोयींचा अभाव असे अनेक प्रश्न मतदारसंघात कायम आहेत.

 

विधानसभा निवडणूक २०१९

 

समीर मेघे (भाजप) १,२१ ८०५

 

विजय घोडमारे (राष्ट्रवादी काँग्रेस) ७५ हजार १३८

 

लोकसभा निवडणूक २०२४

 

महाविकास आघाडी १ लाख १३ हजार ४६८

 

महायुती – ९३ हजार ६०६

About विश्व भारत

Check Also

सुधीरभाऊंसाठी ‘लाडक्या बहिणी’ बनल्या रणरागिणी

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू …

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *