लाच घेण्याचा प्रयत्न केल्याने सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पुणे व सातारा येथील लाचलुचपत विभागाने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांना संशयावरून चौकशीसाठी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
पुणे येथील एका तरुणीने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (खरात वस्ती, दहिवडी, ता माण) किशोर संभाजी खरात ( वरळी, मुंबई) जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.हा प्रकार तीन, नऊ आणि दहा डिसेंबर रोजी घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरूणीचे वडील एका गुन्ह्यात सातारा जिल्हा कारागृहात आहेत. त्यांच्या वडिलांच्या जामीन यावर जिल्हा सत्र न्यायालयात धनंजय निकम यांच्यासमोर सुनावणीसाठी आहे. संशयित आनंद व किशोर खरात यांनी एका अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून जिल्हा सत्र न्यायाधीशांशी संगणमत करून जामीन अर्जासाठी मदत करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे जामीनाबाबत एमएसईबी कोड मध्ये चर्चा झाली. त्याप्रमाणे आनंद व किशोर खरात त्यांच्यासोबतच्या अनोळखी व्यक्तीने पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली. पैसे आणून द्या असे सांगितल्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के करीत आहेत.
याबाबत पुणे येथील लाचलुचपत विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शितल जानवे खराडे यांच्याशी संपर्क साधला असता योग्य ती चौकशी करून माध्यमांना सर्व माहिती दिली जाईल असे सांगितले.
जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याकडे सातारा व वाई जिल्हा सत्र न्यायालय विभागाची जबाबदारी आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांच्यासमोर महत्त्वाच्या गुन्ह्याची सुनावणी सुरू आहे. वाई धोम हत्याकांडातील प्रमुख आरोपी संतोष पोळ याच्याही गुन्ह्याची सुनावणी यांच्यासमोरच सुरू आहे. निकम यांच्याकडे मांढरदेव देवस्थान ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी म्हणून कार्यभारही आहे.