उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि अ.भा. विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमाद्वारे स्वपक्षीयांसह काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनाही खडेबोल सुनावले आहे.
शहरातील महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी या दोन मार्गांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यांपूर्वी केले होते. मात्र आजमितीस या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ‘कमिशन’खोरीच्या वाळवीमुळे कोट्यवधींच्या खर्चातून डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, अशी ओरड काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून नव्हे तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविपचे पदाधिकारी समाज माध्यमाद्वारे करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.
संघ स्वयंसेवक भाजप समर्थक संदीप पोशट्टीवार यांनी तर ‘फॉर्च्युनर’ या आलिशान वाहनातून नेते प्रवास करीत असल्यामुळे त्यांना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची कल्पना नाही, तेव्हा चुक नेत्यांची नाही, तर ‘फॉर्च्युनर’ची आहे, अशा शब्दात स्थानिक लोकप्रतिनिधींना कोपरखळी मारली आहे. संतोष तुंडूलवार यांनी रस्ते बांधणारे कंत्राटदार, देयके काढणारे अधिकारी व कंत्राटदारांना राजकीय आशीर्वाद देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच जनतेने न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
जनतेने रस्त्यांच्या दयनिय अवस्थेबद्दल कितीही तीव्र भावना व्यक्त केली तरी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांना घाम फुटणार नाही. यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन केले आहे. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेसाठी भ्रष्टाचार कारणीभूत असल्याची टिपणीही अनेकांनी केली आहे.
तेलंगणा-महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण, तरीही पथकर वसुली
जिल्ह्यातील तेलंगणा-महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या बामणी-राजुरा-कोरपना-गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असूनही येथे पथकर वसुली सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या महामार्गाच्या कामाला २०२२ पासून सुरुवात झाली. अजूनही महामार्गाचे अनेक ठिकाणचे काम अपूर्ण आहे. वर्धा नदीवरील पुलाचे व गडचांदूर उड्डाणपुलाचे काम सुरूच झाले नाही. बामनवाडा-राजुरा-बामणी हा मार्ग अपूर्ण असताना तसेच रस्त्याच्या सीमेवर संरक्षण भिंत उभारली असतानाही शनिवारपासून राजमार्ग प्राधिकरणाने पथकर वसुली सुरू केली आहे. अपूर्ण कामे पूर्ण होईस्तोवर पथकर वसुली स्थगित करावी, अशी मागणी नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, राज्याचे बांधकाम विकास मंत्री तथा जिल्हाधिकारी, आमदार, प्रकल्प प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.