हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन
चंद्रपूर,
खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून शेतकरी सज्ज झाला आहे. बि-बियाणे, खतांची जुळवाजुळव अंतिम टप्यात आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला असून, मृग नक्षत्राला गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी लावून गेला. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावर्षी पिकांची चांगली लागवड होईल. हवामान खात्याचा अंदाज बघता उत्पादनही चांगले येईल, अशी शक्यता वर्तवित यंदा कृषी विभागाने 4 लाख 82 हजार 800 हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे नियोजन वाढले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. सोयाबीन व कपाशीकडे शेतकर्यांचा कल जास्त असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने कृषी विभागही कामाला लागला आहे. बियाण्यांची उपलब्धता कृषी विभागाने करून ठेवली आहे. खतांचीही टंचाई भासणार नाही, असा दावाही केला जात आहे.
मागील वर्षी शेतकर्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभीच पावसाने दगा दिला. मध्यंतरी पाऊस बरसला. त्यावर कशीबशी पिकांची लागवड केली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पिक पदरी पडण्याच्या कालावधीत रोगाने आक्रमण केले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षीची निसर्गाची अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळपास आटोपली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे. अनेक शेतकर्यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. उन्हाचा पारा कमी झाल्याने शेतकरी दिवसभर शेतात रमू लागला आहे.
दरम्यान, शुक्रवारी चंद्रपूर महानगरासह ग्रामीण भागात पावसाने झोडपले. या पावसाने उकाडा कमी झाला असल्यने शहरी भागातील नागरिक सुखावले आहेत.