विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!
– जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प
नागपूर,
चीननिर्मित कोरोना विषाणुने जगात धुमाकूळ घातला. यामुळे मानवाने आपण निसर्गापुढे किती फिके पडतो, याचाही अनुभव घेतला. मागील टाळेबंदीने जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा समतोल वाढला होता. शिवाय प्रदूषणही घटले होते. सर्वांना शुद्ध हवा मिळू लागली होती. पंजाबातील लोकांना तर थेट हिमालयाचे दर्शन घडले होते. हा सर्व चमत्कार प्रदूषणाची पातळी घटल्याने झाला होता. आताही असाच चमत्कार आपल्याला शेतीच्या संदर्भात करावा लागेल. विषमुक्त शेती ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी लागेल. याकरिता शनिवार 5 जून 2021 या जागतिक पर्यावरणदिनी सर्वांनी संकल्प सोडत विषमुक्त शेतीकडे वळावे, असे आवाहन काटोलच्या कृषिमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक, युपी गौरव प्राप्त, कृषिरत्न दिनेश ठाकरे यांनी केले आहे.
पृथ्वीतलावरील मनुष्य हाही इतराप्रमाणे एक प्राणी आहे. त्यालाही सर्व निसर्ग नियम लागू पडतात. पण बुद्धी असल्याने त्या जोरावर महत्त्वाकांक्षी मानवाने निसर्गाचा र्हास केला. परिणामी आज आपल्यावर अनेक अरिष्ट ओढवले आहेत. शेतीच्या संदर्भात आपण नैसर्गिक शेती सोडून रासायनिक खतांवर अधिक भर दिला. यामुळे विविध आजारांचे माहेरघर आपले शरीर बनले आहे. वस्तुत: निसर्गाने माणसाला शुद्ध हवा, पाणी, फळे आणि खूप काही सर्व मोफत दिले आहे. एक विश्वस्त म्हणून त्या निसर्ग संपत्तीचे जतन मानवाने करायला हवे होते. मात्र विश्वस्त न राहता मानवाने भक्षक बनून निसर्गाला संपविण्याचा घाट घातला.
त्याचे काय वाईट परिणाम होतात याची झलक कोरोनाने संपूर्ण जगातील लोकांना दाखवून दिली आहे. काटोलचे कृषिमित्र प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून विषमुक्त शेतीचा प्रचार व प्रसार करीत आहे. शिवाय शेतकर्यांचे जीवन फुलावे म्हणून चंदनशेती किती लाभदायक ठरेल यासंदर्भातही कार्यशाळा घेतल्या जात आहेत. यातूनच आता सेंद्रीय शेती, जैविक शेती, शाश्वत शेती, विषमुक्त शेती याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य लक्षात घेता सेंद्रीय शेती गावागावात निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला तर नक्कीच मानवी जीवन सुखकर होईल असे मत दिनेश ठाकरे यांनी मांडले आहे.