शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण
चंद्रपूर,दि. 2 जुलै : महाराष्ट्राने कृषीविषयक अनेक अभिनव संकल्पना देशाला दिल्या आहेत. कृषी क्षेत्राचा आणि शेतक-यांचा विकास हे राज्य सरकारचे प्राधान्याचे विषय आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. शेतक-यांच्या समृध्दीसाठी हमीभाव आणि बाजार समित्यांची निर्मिती झाली असून राज्यात या दोन्ही बाबी कायम राहतील, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोरपना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे तसेच गडचांदूर उपबाजार समिती येथील धान्य चाळणी यंत्र आणि कव्हर्ड शेडचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, कृउबासचे सभापती श्रीधर गोडे, उपसभापती योगेश्वर गोखरे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, कोरपनाचे नगराध्यक्ष कांता भगत, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.
शेतक-यांच्या हक्काची बाजारपेठ म्हणून बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, नवीन कृषी कायद्याविरोधात शेतक-यांमध्ये असंतोष आहे. बाजार समित्यांमध्ये शेतक-यांची लेकरे कार्यरत आहेत. कृउबासच्या माध्यमातून शेतक-यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहे. कोरोनाकाळात संपूर्ण जग थांबले असतांना शेतकरी थांबला नाही. लोकांना जगविण्याचे काम शेतकरी सुरवातीपासून करत आला आहे. कारोनाकाळात तर कृषी क्षेत्रामुळेच अर्थव्यवस्था जगली. त्यामुळे शेतक-यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे.
पूर्वीच्या काळी एखाद्या शेतक-याने सात – आठ क्विंटल धान पिकविले तर तो चर्चेचा विषय होऊन त्याची शेती बघण्यासाठी गर्दी होत होती. आज 30 -35 क्विंटलपेक्षा जास्त धानाचे उत्पन्न शेतकरी घेत आहे. हा शेतीमध्ये झालेला बदल आहे. शेतीचे व्यवस्थापन उत्कृष्ट असले की शेतक-याची बचत होते. बीज प्रक्रियेपासून उत्तम नियोजन असणे आवश्यक आहे. कापूस, धान, सोयाबीन, कडधान्याला चांगला भाव मिळत आहे. राज्य सरकारने शेतक-यांना 20 हजार कोटींची कर्जमाफी दिली असून नियमित कर्ज भरणा-या शेतक-याची बाकी रक्कम राज्य सरकार नक्की देणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी व शेतक-यांच्या हितासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. येथील आमदार सुभाष धोटे विकासासाठी अतिशय आग्रही असतात. त्यांच्या नियमित पाठपुराव्यामुळेच या परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना खासदार श्री. धानोरकर म्हणाले, 20 कोटींच्या कामांचे भुमिपूजन आणि लोकार्पण या क्षेत्रात होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब असून राज्य सरकार शेतक-यांचे हित जोपासते. शेतक-यांच्या प्रगतीसाठी बाजार समित्या कार्यरत आहे, असेही ते म्हणाले. तर आमदार श्री. धोटे यांनी कृउबासचे महत्व अधोरेखीत करतांना सांगितले की, कृउबासमध्ये शेतक-यांचा चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी सहकार कायदा अस्तित्वात आला. त्याचा शेतक-यांना चांगलाच फायदा झाला. बाजार समितीच्या संचालक मंडळाने नक्कीच चांगले काम केले आहे. भविष्यातही शेतक-यांचे हित जोपासणे हेच बाजार समित्यांचे उद्दिष्ट असायला पाहिजे, अशा सुचना त्यांनी केल्या.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते कोरपना येथील कृउबासच्या परिसरात मुख्य बाजार कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे यांनी कले.
यावेळी अरुण निमजे, विजय बावणे, पंचायत समिती उपसभापती सिंधू आसोले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
कन्हाळगाव येथे रस्त्याचे भुमिपूजन : एलडब्ल्यूई योजनेअंतर्गत कन्हाळगाव, सावलहिरा आणि येल्हापूर या 11.83 कोटींच्या रस्त्याचे भुमिपूजन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. विकासाची दूरदृष्टी असलेले येथील नेतृत्व आहे. आमदार धोटे आपल्या क्षेत्रात निधी खेचून आणण्यात सक्रीय असतात. कंत्राटदारांनी ठरावित वेळेत मजबूत, टिकावू आणि सुंदर रस्ता बांधावा. पाच वर्षे देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडे असली तरी त्याची आवश्यकताच पडू नये, एवढा मजबूत हा रस्ता झाला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यातील रिलायन्सच्या सिमेंट कंपनीकरीता कच्चा माल राजूरा, कोरपना या भागातून जाणार असल्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून ज्या शेतक-यांचे यात नुकसान होईल, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सदर कंपनीत नोकरी मिळवून देऊ. त्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, राजूरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी श्री. पाचपाटील आदी उपस्थित होते.