Breaking News

कोरोना : नागपुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी… वाचा

केंद्र शासनाकडून जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच विदेशातून शहरात दाखल होणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘नीरी’चे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार, विमानतळ प्रशासनाचे अधिकारी कृष्णा पॉल प्रामुख्याने उपस्थित होते.

केवळ दोन टक्के चाचणी

नागपूर शहरात दोहा आणि शारजा येथून दर आठवड्याला सहा विमाने येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करून त्यापैकी दोन टक्के प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी नंतर घेण्यात आलेले नमूने मेडिकल, एम्स आणि मेयो येथील पॅथॉलॉजीमध्ये पाठविण्यात येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता विमानतळ प्रशासनाशी समन्वयाने कार्य करून चाचणी करण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले आहे.

मनपाद्वारे ३९ केंद्र कार्यान्वित

याशिवाय शहरातील इतर व्यक्तींच्याही चाचणीसाठी मनपाद्वारे ३९ चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण ४३ लाख ८५ हजार ३६४ डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली रुग्णालय, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयसोलेशन हॉस्पीटल, आयुष दवाखाना या पाचही आरोग्य केंद्रांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन व्यवस्थेची तपासणी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्याचेही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथेही ऑक्सिजन बेड्सच्या व्यवस्थेबाबत आढावा घेत त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेता बेड्स तयार ठेवण्याची सूचना राधाकृष्णन बी. यांनी केली आहे.

नि:शुल्क चाचणी

कोरोना संबंधी कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या कोरोना चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. शहरात मनपाच्या दहाही झोनमध्ये ३९ चाचणी केंद्रांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे. अँटिजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या या केंद्रांवर करण्यात येत आहेत.

About विश्व भारत

Check Also

शुगर पेशेंट के लिए रामबाण है यह सफेद मूसली : शरीर में बढ़ेगा इंसुलिन

शुगर पेशेंट के लिए रामबाण है यह सफेद मूसली : शरीर में बढ़ेगा इंसुलिन टेकचंद्र …

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *