राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी आज (५ मार्च) दुपारी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या शिंदे गटावरील टीकेला उत्तर दिलं. केसरकर म्हणाले, त्यांनी आम्हाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तसे वागलो नाही.
शिक्षणमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता. आम्ही मात्र युतीधर्म पाळला. त्यामुळे आम्हाला त्यांच्या टीकेचं काही वाटत नाही. उबाठा गटाने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, परंतु, आम्ही त्यांची बदनामी केली का? खरे बदनाम तर ते आहेत. परंतु, त्यांनी आम्हाला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचे जे कोण राजपुत्र (आदित्य ठाकरे) वगैरे बोलतात, ते मुळात स्वतःकडे काय आहे ते बघून बोलत असतात. त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. नुकतीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीची सर्वांना माहिती आहे. ती भेट कशासाठी होती हे संपूर्ण जनतेला माहिती आहे.