शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. मुनगंटीवार
कर्तबगार नेतृत्व हरपला-डॉ.मंगेश गुलवाडे
माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले-महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शोकसंवेदना
अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला…विजय वडेटटीवार
माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन
राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खाजगी रूग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षाचे होते. दोन आठवड्यापूर्वी ते कोरोनाबाधित झाल्याने त्यांना 14 एप्रिलला नागपूरच्या सक्करदरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती व एकदोन दिवसात त्यांना रूग्णालयातून सुट्टीही मिळणार होती. परंतु, शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या शरिरातील प्राणवायूचे प्रमाण बरेच खाली आले व रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परंतु, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. मुनगंटीवार
राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असून, या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभाग़हात मांडणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याचे बळ देवो, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले-महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शोकसंवेदना
चंद्रपूर, : चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले, अशा शोकभावना चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.
मृद भाषी, शांत व संयमी स्वभावाचे धनी होते. म्हणूनच त्यांच्याविषयी जनमानसाच्या मनात आदर होता. पक्षीय राजकारण, मतभेद विसरून त्यांनी जनसेवा केली. वरोरा- भद्रावती विधानसभा मतदार संघात त्यांनी अनेक लोकोपयोगी विकासकामे केलीत. सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा नेता आपल्यातून निघून गेल्याचे दुःख आहे, अशा भावना चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.
अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला…विजय वडेटटीवार
अजात शत्रु, अत्यंत लोकप्रिय जीवन जगणारे, सुस्वभावी, गेल्या अनेक दशकापासून माझे सहकारी असलेले, जिव्हाळयाचे मित्र संजय देवतळे यांच्या निधनाची वार्ता एकताच अतीव दु:ख झाले. ही न भरुन निघणारी हानी आहे अशी शोकभावना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेटटीवार यांनी वक्त केली.
संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असून या बातमीवर विश्वासच बसत नाही. असेही त्यांनी प्रतिक्रिया देतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी मंत्री दादासाहेब देवतळे नंतर त्यांनी चंद्रपूर जिल्हयाची काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांदयावर घेऊन यशस्वीपणे पुढे नेली, चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे विस वर्ष आमदार होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी दिर्घकाळ जनतेची सेवा केली. राज्यात काँगेस पक्षाची सरकार असतांना ते राज्याचे सांस्कृतीक व पर्यावरण मंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून यशस्वीपणे काम करुन या जिल्हयाच्या विकासात बहुमोल हातभार लावला. अतिशय शांत, लोकप्रिय नेता व अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चंद्रपूर जिल्हयाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे. त्यांचे असे जाने जिल्हयातील न भरुन निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो अशी प्रतिक्रिया विजय वडेटटीवार यांनी दिली.