‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’
रत्नागिरी वन विभागातर्फे आज महत्वपूर्ण वेबीनार
चिपळूण : वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक निलेश बापटयांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ या विषयावर महत्त्वपूर्ण वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (५ जून) सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजता हा वेबीनार संपन्न होईल.
या निमित्ताने चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदींतर्गत अभ्यासकांना आलेल्या अनुभवांची मांडणी केली जाणार आहे. कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणात विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. अलिकडे यातल्या काही पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही वर्षात चिपळूण शहराच्या भौगोलिकतेत झालेल्या बदलामुळे पक्ष्यांचे भ्रमणमार्ग, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांची वसतीस्थाने यात बदल होत आहेत. ईगल, हॉर्नबिल यांसारखे पक्षी वर्षानुवर्षे एकत्र जोडीने राहत असतात. मात्र आता त्यांच्यात, ‘गर्भधारणा (ब्रीडिंग) करावी की नाही ?’ अशी मानसिकता निर्माण झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याच कारणाने चिपळूणात वर्षानुवर्षे एकाच जागेवर घरटे बनविणारा हॉर्नबील पक्षी त्या जागेवर अलिकडे घरटे बनवित नाही आहे. माणसाने निसर्गातील विविध घटकांना विचारात न घेता केलेले बदल याला कारणीभूत असावेत, असे अनुमान आहे. बिल्डींग संस्कृतीत लावल्या जाणाऱ्या काचांवर येऊन पक्षी आपटणे किंवा तिथेच बराच काळ आपल्या चोचीने ‘टकटक’ करत राहण्याचे प्रमाणही सर्वत्र वाढले आहे. खिडकीच्या काचेत दिसणारे आपले प्रतिबिंब पाहून आपल्या भागात दुसरा नर आल्याची पक्ष्याची भावना प्रबळ होऊन त्याने गर्भधारणा (ब्रीडिंग) थांबवण्याचे प्रकार समोर आले आहेत. या बाबतची माहिती वेबीनारमध्ये दिली जाणार आहे. तसेच निसर्ग डायरी कशी लिहायची ? या विषयावर गेली पंधरा वर्षे निसर्ग डायरीतील नोंदी करणारे प्रा. डॉ. हरिदास बाबर मार्गदर्शन करणार आहेत. पक्ष्यांची फोटोग्राफी करताना तो पक्षी वागतो कसा ? याची जाणीव असणे अधिक महत्त्वाचे आहे.‘पक्ष्यांची फोटोग्राफी’ या विषयावर आणि त्यासाठी लागणाऱ्या संयमाबाबत नयनीश गुढेकर मार्गदर्शन करणार आहेत. पावश्या पक्ष्याचे आपल्याकडे किमान ५/६ प्रकार दिसतात. जातीने एकापेक्षा अधिक दिसणाऱ्या पक्ष्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या त्यांचे अचूक विस्तृत वर्गीकरण कसे करायचे ? या विषयी डॉ. श्रीधर जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी समजून घेण्याची इच्छा असलेल्या सर्व पर्यावरण आणि पक्षीप्रेमी जिज्ञासूंनी http://meet.google.com/mic-gvbg-ocp ह्या लिंकद्वारे या वेबीनारचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी केले आहे.