अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेली आहे. अशा या पेच प्रसंगात शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेरीस या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांसह पैसे मागण्यासाठी आलेल्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात हा प्रकार घडला होता.
प्रकरण काय?
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ४०० रुपयांची मागणी होत आहे, अशी तक्रार शिवसेनेने (शिंदे गट) तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी लोकांना(एजंट) शेतकऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे खासगी लोक शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी एकरी २०० ते ४०० रुपयांची मागणी करित आहेत. त्याशिवाय पंचनामे करित नाहीत. त्या संबंधित पैसे मागणाऱ्या व्यक्तींचा शेतकऱ्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर अरेरावाची भाषा करतात. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी. तसेच शेतकऱ्यांकडून अनाधिकृतपणे पैसे जमा करणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी, अधिकारी यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.