प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू कधी कसा येईल? हे कोणीच सांगू शकत नाही. असं असलं तरी डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी डॉक्टरही रुग्णाला वाचवताना हतबल होऊन जातात. सर्वकाही देवाच्या हातात असं सांगून नातेवाईक मनाची समजूत घालतात. अशा प्रसंग आपण चित्रपटात पाहतो आणि अनेक चमत्कार पाहतो. मृत्यूचा दाढेतून रुग्ण परत येतो. असाच काहीसा चमत्कार प्रत्यक्षात ब्रिटनमध्ये घडला आहे. ब्रिटनमधील एका डॉक्टराने आपल्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आहे. ही घटना एका महिलेच्या प्रीमॅच्योर डिलिव्हरी दरम्यान घडली.
महिलेला प्रसुती वेदना होत असल्याने 10 आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी कॉम्प्लिकेशन पाहता डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. पण मुलाचा जन्म होताच त्याने श्वास घेणं बंद केलं होतं. जवळपास बाळ 17 मिनिटांपर्यंत अशा स्थितीत होतं. या दरम्यान डॉक्टर बाळाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. बाळ श्वास घेत नसल्याचं सांगताच नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली. पण डॉक्टरांनी शेवटपर्यंत हार मानली नाही. अचानक बाळ रडू लागलं आणि सर्वांच्या जीवात जीव आला. त्यानंतर तीन महिने बाळावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.