राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती होऊ शकते. तर, सौनिक यांच्या पत्नी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत आहे.
गोड गळ्याचे मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलेली होती.
तत्कालीन मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या निवृत्तीनंतर मनोज सौनिक आणि नितीन करीर यांच्या नावाची मुख्य सचिवपदासाठी चर्चा होती. पण सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांना संधी मिळाली होती. श्रीवास्तव यांना गायनाचा छंद आहे. दररोजच्या बिझी शेड्यूलमधूनही ते आपल्या छंदासाठी वेळ काढतात. सुमधूर आवाजामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं युट्यूब चॅनेलही आहे. त्या माध्यमातून ते आपली विविध गाणी प्रेक्षकांना ऐकवत असतात.
करिरांना करावी लागणार प्रतीक्षा
सध्या तरी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना मुख्य सचिव पदाची संधी मिळणार नसल्याचे कळते. मात्र, मनोज सौनिक यांचे पारडे जड आहे. तर, श्रीवास्तव यांची कुठेतरी वर्णी लागणार, हे निश्चित आहे.