कर्नाटकातील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला ‘आत्मचिंतन’ करण्याचा सल्ला दिला आहे. आरएसएसने मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये सर्वत्र विजयासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्व पुरेसे नसल्याचे म्हटले आहे. भाजपचे मिशन 2024 लक्षात घेऊन RSS ने हा सल्ला दिला आहे. मजबूत जनसामान्य आणि प्रादेशिक नेतृत्वाशिवाय निवडणुका जिंकणे सोपे नाही, असे आरएसएसने स्पष्ट केले आहे.
कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने स्टार प्रचारकांवर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वावर भर दिला होता. कर्नाटक निवडणुकीत असे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले, ज्यांचा थेट संबंध हिंदुत्वाशी आहे. या मुद्यांच्या जोरावर भाजप एकतर्फी विजय नोंदविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जनतेने पक्षाला उलथापालथ करून काँग्रेसला विजयाचा मुकूट दिला. हा भाजपसाठी निश्चितच मोठा धक्का होता.
आरएसएसने टोचले भाजपचे कान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि हिंदुत्ववादी विचार सर्वच ठिकाणी निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे नाहीत,असे म्हटले आहे. विचारधारा आणि केंद्रीय नेतृत्व हे भाजपसाठी नेहमीच सकारात्मक पैलू असू शकतात, पण जनतेचे मनही पक्षाला समजून घ्यावे लागेल अशा शब्दात आरएसएसने भाजपचे कान टोचले आहेत.
कर्नाटक निवडणुकीत भाजपने केंद्राचे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसने स्थानिक प्रश्न सोडले नाहीत. हेच त्यांच्या विजयाचे कारण ठरले असे ऑर्गनायझरमध्ये म्हटले आहे.
संघाकडून चिंता
या मुखपत्रात भाजपच्या रणनीतीवरही संघाने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने जातीच्या मुद्द्यांवरून मतांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला. तंत्रज्ञानाचे केंद्र असलेल्या राज्यात पक्षाने हा प्रयत्न केल्याचे संघाने म्हटले आहे. याबाबत संघाने चिंता व्यक्त केली आहे.
संघाचा पहिल्यांदाच निवडणुकीबाबत भाजपला सल्ला
पीएम मोदी सरकार केंद्रात आल्यापासून म्हणजेच 2014 नंतर पहिल्यांदाच कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा बचाव करताना दिसले. एवढेच नाही तर संघाने भाजपला निवडणुकीबाबत सल्ला दिल्याचेही पहिल्यांदाच घडले आहे.