साडेतीन दशकांत अकोल्यात प्रथमच काँग्रेसची का वाढली ताकद?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
अकोला : एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेस मागील काही वर्षांमध्ये रसातळाला गेली. गत ३५ वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये अकोला मतदारसंघात पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी यंदा प्रथमच नव्या दमाचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांना संधी देण्यात आली. त्यांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावून जिंकण्याच्या दृष्टीने लढा दिला. त्यामुळे साडेतीन दशकांमध्ये अकोल्यात प्रथमच काँग्रेस स्पर्धेत येऊन ३५ टक्क्यांवर अधिक मते प्राप्त केली. अंतर्गत गटबाजी, निष्क्रिय व प्रभावहिन नेत्यांमुळे अकोल्यात काँग्रेसच्या पराभवाची परंपरा अबाधित राहिली असली तरी पक्षाचा जनाधार वाढल्याचे स्पष्ट होते.
१९८४ पर्यंत अकोला जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, त्यानंतरच्या काळात काँग्रेसची प्रचंड वाताहत झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार साडेतीन दशकात निवडून येऊ शकला नाही. दोन दशकापासून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. विविध नेत्यांच्या गटबाजीमध्ये काँग्रेस विभागली गेली. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कायम अॅड. प्रकाश आंबेडकरांमागे फरपटत गेला. १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये आघाडी झाल्याने अॅड. आंबेडकरांनी दोन वेळा लोकसभा गाठली. त्यानंतर दोघेही स्वतंत्र लढल्याने भाजपला पराभूत करू शकले नाही. गत चार निवडणुकीप्रमाणे यावेळेस देखील अॅड. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडीसाठी बोलणीचे सत्र चालूनही आघाडी न झाल्याने अंतिम क्षणी काँग्रेसने निवडणूक रिंगणात उमेदवार दिला. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस जिंकण्याऐवजी पाडण्याच्या नकारात्मक मानसिकतेतून लोकसभा निवडणूक लढली. यावेळेस मात्र चित्र वेगळे होते.