उपमुख्यमंत्री (DCM) देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची चर्चा कायमच होत असते. तसंच देवेंद्र फडणवीस जे बोलतात त्या बोलण्यात एक सूचक अर्थही लपलेला असतो. त्यामुळे त्यांच्या काही वाक्यांमध्येही संदर्भ लपलेले असतात. आता चर्चा सुरु आहे ती देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी. जर असं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चेहरा महाराष्ट्रातून दिल्लीत जाणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दांत सूचक उत्तर दिलं आहे.
दिल्लीत नेमकी चर्चा काय सुरु आहे?
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, त्याचं वृत्तांकन करणाऱ्या हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या प्रतिनिधींपैकी अनेकांनी गुरुवारी भाजप नेत्यांकडून संभाव्य राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या चर्चांमध्ये अन्य काही नावांबरोबरच देवेंद्र फडणवीस यांचंही नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारण सक्रिय केले जाईल असं बोललं जात असलं, तरीही महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असल्याने याबाबत तातडीने निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाही. त्याऐवजी सध्या केंद्रीय मंत्र्यांपैकी एखाद्याची अध्यक्षपदी वर्णी लागू शकेल, अशी चिन्हं आहेत. त्यासाठीही नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. असं असलं, तरीही गुरुवारी देवेंद्र फडणवीसांच्या संभाव्य नियुक्तीबाबत दिल्लीत जोरदार चर्चा सुरू होती. गुरुवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी नवभारत नवराष्ट्र ‘महाराष्ट्र कॉनक्लेव्हमध्ये मुलाखत दिली. त्यात त्यांनी महाराष्ट्रावर आणि दिल्लीला जाण्यावर भाष्य केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणातली कटुता कशी दूर होईल?
महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता निर्माण झाली आहे ती कशी दूर होईल? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही माध्यमं यासाठी जबाबदार आहात. रोज सकाळी नऊ वाजता एक चेहरा तुम्ही दाखवता. तिथून सगळी कटुता सुरु होते. त्यानंतर मग दिवसभर तेच सुरु राहतं. तुम्ही तो चेहरा दाखवणं बंद करा आठ दिवसांत महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता दूर होईल. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यांचा इशारा संजय राऊत यांच्याकडे होता हे उघड आहे. मात्र त्यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जातील, राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चा आहेत. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर
यानंतर देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारण्यात आला की आगामी काळात काही बदल पाहण्यास मिळू शकतात का? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे उद्या काय घडेल हे राजकारणात कधीही सांगता येत नाही. मात्र तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचं उत्तर मी एकाच वाक्यात देईन मी इथेच आहे.” देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रात असल्याचं एका वाक्यात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दिल्लीत सुरु असलेल्या चर्चांना एक प्रकारे त्यांनी पूर्णविराम दिला आहे.