मंत्र्यांच्या शपथविधीनंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नव्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे”. यावर त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. अनेक माजी मंत्री या मंत्रिमंडळात दिसत नाहीत. याची काय कारणं आहेत? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यामागे वेगवेगळी कारण आहेत. मी माझ्या पक्षापुरतं उत्तर देईन. अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणांमुळे मंत्रिमंडळात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल तर त्या नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही. भाजपात कोणाला पक्षात मोठी जबाबदारी द्यायची असेल तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही. तसेच असेही असू शकतं की एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं. अब्दुल सत्तार यांना मंत्री पदावरून डावलण्यात आलेले आहे. याबाबत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. तसेच सिल्लोड मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये सत्तार विरोधात कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. कदाचित भाजप वरिष्ठ नेतृत्वाने सत्तार यांना मंत्री होऊ दिले नसल्याचं समजते.
माजी मंत्र्यांना डावललं
क्र. माजी मंत्र्याचं नाव पक्ष
1 दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
2 छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
3 अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
4 संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
5 धर्मराव आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
6 सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पार्टी
7 विजयकुमार गावित भारतीय जनता पार्टी
8 सुरेश खाडे भारतीय जनता पार्टी
9 रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी
10 तानाजी सावंत शिवसेना (शिंदे)
11 अब्दुल सत्तार शिवसेना (शिंदे)
12 दीपक केसरकर शिवसेना (शिंदे)