पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आता विमान प्रवासासाठी डोकेदुखी ठरत आहे. इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र (Airspace) तातडीने बंद केल्यामुळे एअर इंडिया आणि इंडिगोच्या अनेक विमानांना मोठा फटका बसला आहे. इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. दरम्यान, यामुळे अनेक देशांतील हवाई क्षेत्रांवर परिणाम झाला असून एअर इंडियाचे विमान दिल्ली- तेल अवीव मार्गावरून मुंबईकडे वळवण्यात आले आहे.
“इस्रायलमधील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या हितासाठी २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीहून तेल अविलला णारे एआय-१३९ विमान भारतात परत येत आहे. या अनपेक्षित परिस्थितीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडिया दिलगीर आहे आणि सुरक्षेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी वचनबद्ध आहे”, असं एअरलाइनने म्हटले आहे. “आम्ही आमच्या उड्डाण ऑपरेशन्ससाठी सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या वातावरणाचे मूल्यांकन करत राहू आणि गरजेनुसार ऑपरेशन्समध्ये सक्रियपणे बदल करू”, असं प्रवक्त्याने सांगितले.
इंडिगोने म्हटले आहे की ते इराण आणि त्याच्या हवाई क्षेत्राबाबतच्या प्रादेशिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. “परिस्थिती बदलत असताना आवश्यक ते बदल करण्यास आमचे पथक सज्ज आहेत”, असं X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे आणि प्रवाशांना प्रस्थान करण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितले आहे.
युद्धाचा विमान कंपन्यांवर परिणाम
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ ने एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की बंद हवाई क्षेत्रामुळे अनेक उड्डाणे आणि विमान कंपन्यांवर परिणाम होत आहे.
दरम्यान,इस्रायलने इराणमधील लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर काही तासांतच इस्रायलच्या विविध भागांत हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. त्यानंतर इराणी क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. काही क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे अडवण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
विश्वभारत News Website