‘एआय’ तुमचा वेग वाढवू शकते. पण निर्णयक्षमता, नैतिकता आणि न्यायबुद्धी ही केवळ प्रशिक्षित कायदेतज्ज्ञांची ताकद असते. ‘एआय’वर प्रभुत्व मिळवा; पण त्याचे गुलाम होऊ नका, त्यांच्या आहारी जाऊ नका, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘एआय’ माहिती शोधू शकते, मसुदा तयार करू शकते, पण सल्ला देऊ शकत नाही किंवा नैतिक निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवारी विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके, कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार, कुलसचिव दीपक भागवत उपस्थित होते. विश्वनाथन म्हणाले, २१व्या शतकातील वकिलांनी तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ काय आहे, ‘एआय’चे उत्तर तपासणे कसे, ‘हॅलुसिनेटेड’ संदर्भ कसे ओळखायचे हे शिका.
न्यायालयात खोटे संदर्भ सादर झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्याची किंमत ग्राहकाला मोजावी लागते. ‘एआय’ माहिती शोधू शकते, मसुदा तयार करू शकते, पण सल्ला देऊ शकत नाही किंवा नैतिक निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपली विचारशक्ती पूर्णपणे मशीनकडे सोपवली, तर तुम्ही वकील राहणार नाही असेही ते म्हणाले. विश्वनाथन यांनी नांबियार, फेडरर, नरीयम यांची उदाहरणे देत, विद्यार्थ्यांना विविध मूल्यांची जपवणूक करण्याचे आवाहन केले.
मूलभूत कौशल्ये जपा – न्या. चांदुरकर
कायद्याचे शिक्षण केवळ कारकिर्दीसाठी नसून संवैधानिक मूल्ये, समानता व बंधुत्व यांची जपणूक करण्यासाठी असल्याने समाजाबद्दल जबाबदारी जपण्याचे आवाहन कुलपती आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी केले. यावेळी त्यांनी तंत्रज्ञान व ‘एआय’चा योग्यरित्या वापर करा, मात्र मूलभूत कौशल्ये जपा, असा सल्ला त्यांनी दिला.
पालकांच्या हस्ते मुलांचा सत्कार
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी असलेले माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांची कन्या करिश्मा गवई हिला पीएच.डी. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. भारती डांगरे यांचा कन्या आयुषी डांगरे हिलासुद्धा पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात आले.
हरेंद्र सिंह, मीनल माहेश्वरी यांना सर्वाधिक सुवर्णपदके
पदवीदान समारंभात एकूण २१३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात १८ पीएचडी, ५७ एलएलएम (स्नातकोत्तर विधी), १०१ बीएएलएलबी (ऑनर्स) आणि ३७ बीएएलएलबी (न्यायिक अध्ययन विशेष) या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी एकूण २५ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. बी. ए. एलएलबी (ऑनर्स)मध्ये हरेंद्र सिंह यांना सर्वाधिक ८ सुवर्णपदके, तर मीनल माहेश्वरी यांना ६ सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.
याशिवाय अपरिमिता तिवारी (३), स्वास्तिक सक्सेना (२), तसेच सृष्टि वर्मा आणि प्रांजल कुमार यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. बी. ए. एलएलबी (न्यायिक अध्ययन विशेष) अभ्यासक्रमात खुशी रावत यांना २ सुवर्णपदके, तर आदित्य बाजपेयी आणि भाव्या पोखरियल यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
विश्वभारत News Website