टायर्स पंक्चर दुरूस्तीच्या नावाखाली अवैध डिझेल व दारूविक्री.
(भोयगाव रोड वरील नारंडा फाटा येथील प्रकार.)
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
डिझेल,पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे.दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ लक्षात घेता डिझेल चोरी व काळाबाजारीचे प्रकरण सुद्धा वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर भोयगाव मार्गावरील नारंडा फाटा येथील “सॅम्युअल होमियोपैथी” दवाखान्या समोरील टायर पंक्चरच्या दुकानात अवैध रित्या डिझेलची साठवणूक करून विक्री केली जात आहे.तसेच दूकानात व मागे पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहून याठिकाणी डिझेल सोबतच अवैध दारूविक्री सुद्धा जोरात सुरू असल्याची शंका निर्माण होत आहे.सदर मार्गावरील सिमेंट,कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांचे काही चालक स्वत: डिझेल काढून देताना निदर्शनास येत आहे.
अशाप्रकारे अवैधरीत्या साठवणूक केलेल्या डिझेल बाबत त्याठिकाणी उपस्थित एका व्यक्तीला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तर दुसऱ्याने चक्क डिझेल आणून देणाऱ्या वाहन चालकाला अश्लील हातवारे करत सांगितले की “भीतीचे काहिच कारण नाही,कुणीच काही उ…! नाही” हा व्यक्ती दारूचे सेवन करून होता.सदर ठिकाणी टायर पंक्चरच्या नावाखाली इंधन विक्रीचे सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून अवैधरीत्या सर्रासपणे डिझेलची साठवणूक व विक्री तसेच जिल्हा दारूबंदी असताना बिनधास्तपणे अवैध दारूविक्री होत असून संबधितांनी याकडे लक्ष देऊन सदर दुकानदारावर कायदेशीर कारवाई करून याठिकाणी सर्सपणे सुरू असलेला प्रकार बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.