मोबाईल टॉवरचे काम थांबवा,अन्यथा आंदोलन.
(न.प.ला निवेदनातून इशारा.)
कोरपना(ता.प्र.):-
गडचांदूर येथील प्रभाग क्रं.६ येथे मोबाईल टॅावर उभारण्यात येत आहे.मात्र यासंबंधी परिसरातील नागरिकांना विश्वासात घेत कुठलीही चर्चा करण्यात आली नाही.तसेच परवानगी सुद्धा घेण्यात आली नसल्याची माहिती आहे.मागील वर्षापुर्वी सदर टॉवरचे काम सुरू झाले असता नगरपरिषदेला तक्रार करण्यात आली होती तेव्हा काम बंद करण्यात आले होते.पण तेच काम आता पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे.मोबाईल टॉवरमधुन निघणार्या रेडिएशनमुळे भविष्यात नागरिकांना विशेषतः लहान मुलांना मेंदुज्वर सारख्या आजारांची लागण होण्याची तसेच जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे असताना जर सदर ठिकाणी मोबाईल टॉवरची उभारणी झाली आणि यामुळे भविष्यात कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक न.प.व टॉवर संबंधी व्यक्तीवर राहील.तरी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वीच तात्काळ टॉवर उभारणीचे काम थांबवावे,परवानगी दिली असल्यास ती रद्द करावी अशी मागणी वजा विनंती करण्यात आली असून असे न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे महादेव हेपट,शरद मेश्राम,विठ्ठल कोडापे,योगेश ठाकरे,आशिष आगरकर,प्रमोद जुनघरे,अब्राहम मोहितकर आदी कार्यकर्त्यांनी न.प.मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.आता न.प.याविषयी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.