कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र
मुंबई,
कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या निधीचा वापर करण्यासाठी राज्यांना केंद्राची परवानगी अनिवार्य असते. यासाठी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विनंतीवजा पत्र लिहिले आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. सध्या पूर, वीज कोसळण्याच्या घटना, मुसळधार पाऊस यासारख्या घटना आपत्तीच्या कक्षेत येतात. या आपत्तीमधील पीडित लोकांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते. कोरोना महामारीमुळे राज्यातील हजारो लोकांच्या कमाईवर, उपजीविकेवर परिणाम झाला आहे, त्याच उद्देशाने मुख्यमंत्र्यांना या निधीचा वापर करायचा आहे. आम्हाला हा निधी वापरण्यासाठी केंद्राकडून कायदेशीर परवानगी हवी आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
