चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन
चिमूर .
चिमूर(16 एप्रिल)- चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव, दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर क्रांतीनगरी टाइम्स या डिजिटल न्युज पोर्टल चे संपादक गणपत खोबरे (वय 41वर्षे) यांचे निधन दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 11.30 चे दरम्यान झाले.
गणपत मनीराम खोबरे यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता, ते स्वतःहुन रुग्णालयात उपचारा साठी दाखल झाले, उपचारा दरम्यान चाचणीत ते कोरोना पाझिटिव्ही निघाले, काल दि.15 एप्रिल रोजी चिमूर येथून त्यांना ब्रम्हपुरी येथे सीटीस्कान करण्यासाठी हलविण्यात आले होते. काल रात्री 9.30 वाजताचे दरम्यान चिमूर येथील कोविड सेंटरला आणण्यात आले, त्यानंतर रात्री 11.30 वाजताचे दरम्यान निधन झाले.
गणपत खोबरे यांनी ग्राम पंचायत,शेडेगाव चे सदस्य म्हणून काम केले असून ते बाळशास्त्री जांभेकर सार्वजनिक वाचनालय, शेडेगावचे संस्थापक होते, पत्रकारीतेच्या सोबतच त्यांचा राजकीय, सामाजिक व अन्य रचनात्मक उपक्रमात सहभाग असायचा.
घरात कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक, सामाजिक वारसा नसतांना त्यांनी स्वकष्टाने पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. गरिबी ते मध्यमवर्गीय जीवन जगताना गणपतराव यांना अनेकांनी बघितले आहे, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे
———-–—–
” पत्रकारिता कुणाचीही मक्तेदारी नसुन मेहनत घेऊन काम केल्यास सामान्य माणसाला न्याय देण्यासोबतच आपली ओळख निर्माण करता येते, हे गणपतराव यांनी दाखवून दिले, त्यांचे निधन आमच्यासाठी खूप वेदनादायक आहे,
त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा गुण आम्हाला खुप शिकवून जायचा, तोंडावर बोलून लगेचच हास्य चेहऱ्याने मैत्रीपूर्ण बोलणे, या गुणामुळे त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता.
पत्रकारिता करीत असताना आमचा रोजचा संबंध यायचा,दरम्यानच्या काळात आम्ही असंघटित कामगार व जबरणजोत या प्रश्नावर सक्रिय होतो, त्यात पत्रकार म्हणून व हितचिंतक म्हणून त्यांचा सक्रिय पाठिंबा असायचा, त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता, सामाजिक, राजकीय, वाचन चळवळीत त्यांची उणीव जाणवू लागली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल कष्टकरी जन आंदोलन व पुरोगामी संदेश परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांना अखेरचा नमस्कार म्हणणे सुद्धा वेदनादायी वाटते”
– सुरेश डांगे