अखेर अर्कापल्लीवाशीयांनी सोडला सुटकेचा श्वास
बहुप्रतिक्षित रस्त्याचे बांधकाम पूर्ण…
📝अहेरी : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्कापल्लीवासीयांना मागील अनेक वर्षांपासून पक्या रस्त्याची प्रतिक्षा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने हा रस्ता बांधकाम पुर्णत्वास आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून वाहतुकीच्या होणाऱ्या त्रासापासून सुटकेचा श्वास सोडला आहे.
अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली परिसरातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्कापल्ली या गावी जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात होती. अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन सदर रस्ता मंजूर करून घेतला. मात्र, रस्ता बांधकामासाठी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने काम पूर्ण होणार की नाही, अशी भिती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती.
अखेरीस या १.५ कि. मी. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. यामुळे हा रस्ता वेळेत पूर्ण करण्यात आला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रस्ता पुर्ण झाल्याने रेपनपल्ली परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार, जिल्हा परिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहे.