Breaking News

मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह

Advertisements
मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका युगाचे नाव आहे. या युगपुरुषाने मानवी जीवनात स्वातंत्र्याची पहाट निर्माण करून समाजमनात समता, न्याय, स्वतंत्र आणि बंधुत्वाचा सूर्य उगवला तो कधीच न मावळणारा आहे. म्हणून इथल्या शोषित, पीडित, दलित, वंचित, दिनदुबळ्या समाजाने आज ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या काळजावर गोंदवून ठेवलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही एका जातीय वर्गासाठी नसून समस्त मानवाच्या कल्याणाची व उद्धाराची आहे. म्हणूनच या चळवळीला जगभरात मानवी स्वातंत्र्याचा लढा म्हणून ओळखल्या जाते. याच चळवळीने माणसाला माणसाचे जीवन जगायला शिकविले कारण इतिहासाचे अवलोकन केले असता इथल्या व्यवस्थेने माणसाचा केलेला अमानुष छळ आज ही अंगावर काटा आणतो उच्चनीचता,जातीयवाद,भेदाभेद, अन्याय,अत्याचाराने गच्च भरलेल्या विचारांना त्यांनी जाळण्याचं काम करून मानवी जीवन उद्धारासाठी फुले,आंबेडकरी विचारधारेने केले. म्हणूनच आज आम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारतोय हे ही इथल्या समजदार माणसाने समजून घ्यायला हवे कपटी व्यवस्थेने माणसांचा छळ तर केलाच स्रियांच्या छळाला तर सीमाच नव्हती. ज्या स्रियांच्या उदरातून माणसाने जन्म घेतला त्याच माणसाने स्रियांना हीन लेखने या सारखी लाजिरवाणी गोष्ट जगाच्या पाठीवर कुठेच नाही. 
म्हणूनच राष्ट्रपिता ज्योतीराव फुले,सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षात्मक कार्याला सॅल्युट करून इथल्या स्रि पुरुषांनी जीवन जगतांना त्यांच्या विचारांना वंदन करावे. याच मार्गाने मार्गस्थ होतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बील मांडण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि इथली स्री ही पुरूषांच्या बरोबरीने आज समाजात स्वाभिमानाने जीवन जगत आहे. हे कुठल्याही उपासा तापासाने स्रियांना स्वतंत्र मिळालेलं नाही. म्हणून माझ्या तमाम माय माऊली यांना नम्रपणे आवाहन करतो तुमचा उध्दारकर्ता दुसरा तिसरा कोणी नसून सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून आज आपण स्वातंत्र्याचे जीवन जगत असतांना या महामानवांच्या संघर्षात्मक विचारांना स्मरून आपण त्यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करायला हवा. कारण या जगात परिवर्तनाची सगळ्यात मोठी शक्ती ही स्रि आहे .
फक्त स्रियांनी आपल्या अंतर्मनात जाऊन आपल्या अंतर्गत असणारी ऊर्जा चा वापर करावा. नाही तर पूर्वीच्या स्रिया ह्या देवदासी, मुरळ्या, जोगतीन म्हणून जगल्या म्हणूनच त्यांच्यावर अन्याय,अत्याचार होत होते या सर्व गोष्टींचा विचार केला तर आज स्रियांवर अन्याय अत्याचार होत असतील तर आजची स्रि ही सुद्धा देवदासी, मुरळी, जोगतीन सारखी जगत आहे असे आपल्याला दिसून येईल आजच्या स्रियांनी जर फुले, आंबेडकर विचाराने जगायला सुरुवात केली तर इथल्या स्रियांच्या वाट्याला जाण्याची कोणाचीच हिम्मत होणार नाही म्हणून स्रियांनी अन्याय, अत्याचार, गुलामगिरीला नष्ट करण्यासाठी फुले, आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक लढे उभारलेत त्या प्रत्येक लढ्यात स्रियांच्या सहभाग आहे .बाबासाहेबांच्या अनेक लढयांसह महाडचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो वा धर्मांतर असो या प्रत्येक वेळी स्रियांची संख्या मोठया प्रमाणात होती. परंतू या चळवळीत त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या कुठे फारसा दिसत नाही म्हणून संशोधकाने याचा शोध घ्यावा स्रियांच्या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्रि वर्गात जागृती झाली तर त्या अस्पृष्य समाजाची फार मोठी प्रगती घडवून आणू शकतात. याची मला जाणीव आहे. महिलांची संघटीत संस्था असावी यावर माझा विश्वास आहे. सामाजिक दुर्गुण नाहीसे करण्यात त्यांची फार मोठी सेवा आहे माझ्या अनुभवावरून मी हे सांगतो आहे. दलित समाजाचे कार्य हाती घेतले तेव्हाच मी निर्धार केला होता की, पुरुषांच्या बरोबरीने स्रियांनाही पुढे नेले पाहिजे. 
महामानवांच्या या विचारातून स्रियांमध्ये किती ताकद असते हे आपणास दिसून येते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानून धर्मांतरा नंतर समाजामध्ये जे बदल झाले त्या प्रत्येक परिवर्तनवादी वळणावर अनेक स्रिया आपल्याला दिसून येतात. आजही आपल्या आजू बाजूच्या परिसरात प्रत्येक स्रि ही महिला मंडळ निर्माण करून आंबेडकरी विचार आणि चळवळ बळकट करीत असतांना आपल्याला दिसत आहेत. अशाच प्रकारचं व्यक्तिमत्त्व असलेलं, आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेल्या प्रसिद्ध कवयित्री संघमित्रा अशोक गेडाम यांच्या कुटुंबाच्या कार्य आणि कर्तुत्वाला सलाम करतो. आज ही गेडाम परीवार काहीच गाजावाजा न करता इथल्या अनेकांचा आधार झाल्याचे दिसून येत आहेत. यांचा परिचय मी इथे मांडल्यास आपण हेच म्हणाल की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं कुटूंब आहे High living and high thinking. असो सांगायचे तात्पर्य असे की संघमित्रा गेडाम, रेखा खोब्रागडे, विद्या सुटे, रंजना मेश्राम, मीनाक्षी मून, निरुपमा पुडके, डॉ. शिला देशपांडे, सिता पाटील, नाजरा पटेल, रेखा साखरे, संघमित्रा खोब्रागडे यांनी महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानून सावित्रीमाईचं आणि माता रमाईचं स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन सर्व जात धर्म वर्गातील एका विचारांच्या महिला एकत्र येऊन या सर्व मैत्रिणींनी जून २०१६ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता भूमीत दीक्षाभूमीला साक्ष ठेऊन नागपूर येथे मैत्रिणी या महिला संस्थेची स्थापना केली. 
हा मैत्रिणी समूह नव्यायुगाची नांदी ठरेल यात शंकाच नाही असं चळवळीसाठी महत्त्वाचे कार्य मैत्रिणी करीत आहेत. याच मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या विहारांना भेटी देऊन तेथील महिलांना बौद्ध धम्माचे मानवी जीवनात असलेलं महत्व स्पष्ट सांगून आपल्यातील चळवळीच्या स्रि जाणिवा व्यक्त केल्या आणि आंबेडकरी चळवळीत सक्रिय झाल्या म्हणून मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मैत्रिणी या महिला संघाचे एक विशेष म्हणजे संविधान जागृती, म्हणजे आम्ही भारताचे लोकचे वाचन तसेच मानवी मुक्तीचा जाहीरनामा असलेल्या बावीस प्रतिज्ञाचे वाचन आणि प्रसार करून समाज मनात जनजागरण करीत आहेत या ही पुढे जाऊन सांगायचे म्हणजे सर्वच्या सर्व महिला ह्या उच्च शिक्षीत तर आहेतच त्यांचे सर्व कुटुंब सुध्दा उच्च विद्याविभूषित आहेत या महिला स्वतःच्या प्रसिद्धी साठी कुठलाच गाजावाजा करीत नाही आपलं कर्तव्य म्हणून कार्य करतात फक्त आंबेडकरी चळवळीला कसे गतिमान करता येईल या कडे त्यांचे लक्ष असते. याच माध्यमातून त्यांनी मैत्रिणी ही संस्था स्थापन करताच संघमित्रा गेडाम यांच्या पुढाकाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या २०१६ साली असलेल्या १२५ व्या भीमजयंती निमित्ताने १२५ कवितांचा काव्यसंग्रह “कविता भीमाच्या” या महाकाव्य संग्रहाचे संपादन केलेले आहे.
भीमाच्या कविता हा काव्यसंग्रह मराठी साहित्यातील कवितेला नक्कीच उच्च स्थानावर नेणारा आहे. या मध्ये जेष्ठ कवयित्रीसह नवोदित अश्या एकशे पंचवीस कविता आहेत. या काव्यसंग्रहाचे एक विशेष म्हणजे या मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बंजारा बोलीतील कविता आहेत. विविध बोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा आपण अभ्यासतो तेव्हा कविता भीमाच्या हा संपादित महाकाव्यसंग्रह अभ्यासकाने अभ्यासावा इतका महत्वाचा आहे. आपल्या मराठी साहित्यात संपादनाची परंपरा फार जुनी आणि महत्वाची आहे आणि ती आज पर्यंत टिकून आहे. या परंपरेला धरूनच हा काव्यसंग्रह या मैत्रिणी संघाने संपादित केलेला आहे. कविता भीमाच्या या संपादन कार्यात मैत्रिणी ने एक प्रकाशन समिती नेमली या मध्ये रेखा खोब्रागडे, संघमित्रा गेडाम, सुनीता सोडवले, इंदू थुल, कमल मून, छाया सुखदेवे या प्रकाशन समिती महिलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाईच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कवितांची निवड करून मराठी साहित्यासह आंबेडकरी चळवळीतील साहित्याला उज्वल केले. आंबेडकरी चळवळीतील साहित्याला कवितेची फार मोठी परंपरा आहे. या परंपरेचा प्रवाह दिवसेंदिवस वाढतच आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख अनेक प्रतिभावंतांनी रेखाटलेला असून काळजावर गोंदून घेतला आहे. आमच्या जीवनातील काळोख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड संघर्षातून कसा दूर केला आहे आपल्या अस्मिता या कवितेत आयु.संघमित्रा गेडाम म्हणतात.
मनुवादाच्या वणव्यात जळत होतो
रोजचेच आमचे मरण नित्य पाहत होतो
काळोखाचे सावट सारून क्रांतिसूर्य उगवला
ज्ञानसूर्य आला आमुचा ज्ञानसूर्य आला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करून आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि आम्ही बौद्ध म्हणून जगायला लागलो पण वागण्यात आमच्यात तफावत असल्यामुळे आम्ही आमच्या पूर्वाश्रमीच्या परंपरे नुसार वागत असल्याने म्हणजे उपास, तापास, नवस या सह पूर्वाश्रमीच्या पोट जातीला चिकटून असल्याने आमच्या चळवळीचे फार मोठे नुकसान होत आहे म्हणून आपले परिवर्तन कुठे गेले? असा सवाल कवयित्री उर्मिला सुधीर माने आपल्या बाबासाहेब आणि आम्ही या कवितेत व्यक्त करतात
बाबासाहेब म्हणाले…
जळत्या घरात जाऊ नका
आम्ही मात्र डोक्यावर घेतले
आणि होरपळलो…
शांतिदुत महामानव तथागत बुद्ध म्हणतात बुध्द धम्म हा शुद्ध धम्म आहे येथे भेदभाव नाही श्रमण, भिक्षू, ब्राम्हण, भंगी मग तो कोणत्याही असो जातीचा येथे सारे एकच आहेत असो यमुना, ब्रम्हपुत्रा, गोदावरी कोणत्याही ह्या नद्या आप आपल्या प्रांतातून सागरात जातात त्या सर्व नद्यांचं पाणी एक होतं समजत नाही मग की हे यमूनेचं की गंगेचं गोदावरीचं पाणी? तसाच माझा धम्म महासागरा सारखा आहे. याच आशयाची कविता कवयित्री संध्या कळमकर यांची इंग्रजी बोलीतील Fact to Future ही कविता आहे या मध्ये त्या म्हणतात,
An Holistic Thinker ,
Writer and Orator ,
An Idol , A Thought ,
A Concept he was ,
Belief in Liberty , Equality
and Fraternity he had ,
Chose Buddhism as a Religion
आमच्या जगण्याचा ऑक्सिजन म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अथक परिश्रमातून इथल्या बहुजनांच्या पिढ्यांपिढया उध्दारल्या म्हणूनच आमचे जे काही आहे ते सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे. आज आम्ही स्वाभिमानाने जे आज जीवन जगत आहोत ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच म्हणून कविता भीमाच्या या महाकाव्यासंग्रहात हिंदी बोलीतील मीनाक्षी गेडाम यांची जयभीम ही कविता आमच्या काळजाचा ठाव घेते गेडाम म्हणतात.
हमारा मान हैं जयभीम !
हमारी शान है जयभीम !
हमारी जान हैं जयभीम !
हमारा स्वाभिमान हैं जयभीम !
वरील कविता म्हणजे सबकुछ बाबासाहेब सांगून जाते. कविता भीमाच्या या काव्यसंग्रहाचा अभ्यास करतांना यातील सर्वच कविता महत्वाच्या आहेत या सर्वच कवितांचा येथे उल्लेख करणे शक्य नाही कारण हा विचारांचा उत्सव असून विचारांचाच महाकाव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात मराठी, हिंदी, इंग्रजी बोली बरोबरच बंजारा बोलीतील कविता ही आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून आपण आपले जीवनमान उजळुन टाकावे म्हणून कवयित्री यशोदा पवार या आपल्या गोर बोलीत भीमा या कवितेत म्हणतात.
पुस्तक वाचन भीमा किदो चिंतन
वाचनेरो छंद मोठो रे घडणं
चिंतन मननेरो किदो आचरण
पुस्तकेरो परिणाम भीमाप व्हियो
भीम करिय कुळंसो काम र
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवाची व संसाराची पर्वा न करता इथल्या बहुजन समाजाचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रचंड संघर्ष करून आपल्याला माणसाचं जीवन प्राप्त करून दिलं या मागे रमाई चा त्याग ही समाजाने समजून चळवळी साठी कार्य करावे त्यांचा त्याग लक्षात घ्यावा तरंच चळवळीचं सार्थक होईल याच विचाराने मैत्रिणी कार्यरत आहेत आपण सर्वांनी एकाच बोधिवृक्षाच्या छायेखाली जीवन जगावं आणि आपण मार्गक्रमण करावं या विचारांची रजनी फुलझेले यांची कविता सांगून जाते त्या म्हणतात.
विसावला भीम माझा
बोधीवृक्षा खाली
तिथूनच नव्या युगाची
सुरुवात झाली…
“कविता भीमाच्या” या संपादित काव्यसंग्रहाचे चिंतन मनन करीत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या जीवना विषयी त्यांच्या जीवन कार्यावर मैत्रिणी या महिलांनी आपली कृतज्ञता काव्याच्या माध्यमातून व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान हे सातासमुद्रापार असून जगभरात त्यांच्या विचारांचा उत्सव साजरा केल्या जातो सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांना ओळखले जाते असा हा जगविख्यात विचारवंत युगप्रवर्तक आहे आणि आपण त्यांचे अनुयायी याचा अभिमान आम्ही काळजात गोंदून ठेवला आहे म्हणून अश्याच आशयाची कविता इंग्रजी भाषेत डॉ. प्रियंका जगताप गेडाम यांनी रेखाटलेली आहे ते आपल्या THE EXTRAORDINARY या कवितेत म्हणतात.
What else for the Bharat Ratna Awardee and
The Greatest Indian of the venture..
He is our brightest mind ,
whose works will be dignified beyond time ..
This was his glorious story ..
Dr. Bhimrao Ramji Ambedkar – The Extraordinary
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून जगाने मान्य केलेले आहेत या महामानावा मुळेच आपले जीवन उजळुन निघालेले आहे. पिढ्यांपिढी पासून आपण जीवन जगत असतांना आपल्याला गुलामीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी इथला कुठलाच देव धाऊन आलेला नाही म्हणून आमच्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वकाही आहेत त्यांच्याच संघर्षाने आज आम्ही प्रकाशमान झालेलो आहोत याच विचारांची कविता रेखा खोब्रागडे यांनी आपल्या संविधानाची संजीवनी या कवितेत म्हटले आहे त्या म्हणतात.
ना आले कामी पूजा अर्चा
ना कुठला जादू टोना
ना मरीमाय ना देवीमाय
ना ही कोटी कोटी देवा देव
स्वतंत्र, समता, बंधुता घेऊन
आला भीम महामानव.
जातीयतेचा वणवा पेटत असतांना अन्याय, अत्याचार, उच्च निचतेचा हाहाकार असतांना बाबासाहेबांना त्या काळी कसा संघर्ष करावा लागला असेल चौफेर बाजूने या व्यवस्थेने प्रत्येक क्षेत्रात मुस्कटदाबी केली असतांना मुक्तपणे कसे वावरणार? हा प्रश्न मनात असतांना बाबासाहेबांचे विचार आठवतात “शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा ” असा हा आमचा बाप अख्य जीवन वाघा सारखं जगला याच विचारांची कविता रंजना मेश्राम यांची आहे. त्या भीम माझा एकला या कवितेत म्हणतात.
ना कुणाची केली आस
होती फक्त रमाईची साथ
दिन-दलितांचा उध्दार
हाच एक मनी ध्यास
घेऊनिया चालला तो
भीम माझा एकला…
खरंच बाबासाहेब नसते तर? हा प्रश्न आपणच आपल्याला आज विचारावा व आजच्या या भयावह अवस्थेत आज आपली अवस्था काय झाली असती? कारण इथल्या व्यवस्थेला बाबासाहेबांचे विचार आज ही त्यांच्या उरात धडकी भरतात. आजची कर्मठ व्यवस्था आज ही त्यांच्या पुतळ्याला सुद्धा घाबरतात. जगात समता, स्वतंत्र, न्याय आणि बंधुभाव चे विचार समाज मनात पेरणारा विचारवंत होणे आता नाही असा हा महामानव माणूस, समाज आणि देश उद्धारासाठी अहोरात्र जीवनभर संघर्ष करीत राहिला म्हणूनच या महामानवाला अख्य जग नतमस्तक होतांना आपण पाहतो आहे याच विचारांची डॉ. नाजरा पटेल यांची डॉ. भीमराव उस महामानव का नाम कविता आहे त्या म्हणतात,
कर गुजर गए वो भीम थे
दुनिया को जगाने वाले भीम थे
हमने तो सिर्फ इतिहास पढा हैं यारों
इतिहास बानाने वाले भीम थे
आंबेडकरी समाजात जीवन जगत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या विचाराने आज आपण मानासन्मानाने आणि स्वाभिमानाने जीवन जगत आहो म्हणून शिका ! संघटित व्हा !! आणि संघर्ष करा !!! हा भीमविचार आपल्या जीवनाचं सार्थक करतो याच आधारावर आयु.निरुपमा पुडके संघटित व्हायचं आहे ! या कवितेत म्हणतात .
निंदन करून शेजाऱ्याच्या शेतात
दोन पैसे जोडू फाटक्या संसारात
बाप म्हणाला, नको मजुरीची घाई
त्याला करू दे, शिक्षणाची कमाई
माय बापाचा हा संवाद चळवळीला गतिमान करतो उद्याचा सूर्य आपला उगवण्यासाठी हे शिक्षणामुळेच आपल्याला समजले आणि उमजले म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे बाबासाहेब सांगून जातात. अश्याच विचारांची व्यवस्थेला जाब विचारणारी कविता छाया सुखदेवे यांची आहे त्या म्हणतात.
स्त्री पुरुष समान आहे घटनेमुळे
स्रियांवर अत्याचार नको या पुढे
बलात्कार करणाऱ्यांनो स्त्री तुमची माता
याद राखा या पुढे मिळतील लाथा
थेट व्यवस्थेला प्रश्न करून याद राखा म्हणणारी ही कविता क्रांतीला गर्भार करते आणि क्रांतीच्या मार्गाने मार्गक्रमण करायला लावते हा विचार फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच आपल्यात निर्माण झाला म्हणून आजच्या महिलांनी बाबासाहेबांचे विचार वाचायला हवेत कारण बाबासाहेब आहेत तर आपण आहोत म्हणून इंदू थुल आपल्या बाबा तुम्ही हयात असता तर? या कवितेत म्हणतात.
बाबा ! तुम्ही आज हयात असता तर…
नेत्यांनी पक्षाची विभागणी करून धिंडवडे काढले नसते
जाती भेदाच्या भिंती कधीच्याच मिटल्या असत्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर आपल्या समाजाची झालेली होरपळ कधीच भरून निघणारी नाही कारण महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात,
भीमा तुझ्या मताचे
जर का पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या…
न्यारेच टोक असते
याच आशयाची कविता संघमित्रा खोब्रागडे यांची आहे आप आपसातील वैर दूर सारून बाबासाहेबांच्या विचाराने आज आपण चालणे महत्त्वाचे आहे म्हणून त्या आपल्या जयंती या कवितेत म्हणतात.
शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा
हा नवा एल्गार दिला खरा
सर्वांसाठी हाच संदेश बरा
कशाला भांडता करा विचार जरा
म्हणूनच आंबेडकरी चळवळीत आणि समाजात विचारांना फार महत्त्व आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. तरच समाजमनात समता, स्वतंत्र, न्याय आणि बंधुभाव रुजविल्या जाईल आणि माणूस हा माणूस म्हणून जगेल म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जातीविरहीत बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपल्यात नवचैतन्य निर्माण केले आणि आपण मानवतेच्या दिशेने निघालो याच आशयाची रेखा साखरे यांची ओढ दीक्षाभूमीची कविता आहे त्या म्हणतात.
थकत नाही माझे मन
सेवा घडू दे दीक्षा भूमीची
खर्ची पडू दे तन मन धन…
समाजात समता, न्याय, स्वतंत्र आणि बंधुभाव रुजावा म्हणून ही धडपड या कवितेतून दिसून येते म्हणून मी तन मन धन अर्पण करून चळवळीला गतिमान करीत आहे. म्हणून मित्र हो ! दीक्षाभूमी हे जगातील समतेचं प्रतीक आहे याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन येथूनच आपला नवाजन्म झाला आणि आपण माणूस म्हणून जगायला लागलो अश्याच विचारांचा हा कविता भीमाच्या हा काव्यसंग्रह वाचनीय असून मराठी साहित्यात, आंबेडकरी चळवळीतील साहित्यात हा काव्यसंग्रह नक्कीच दिशा दर्शक ठरेल या निमित्ताने सर्व मैत्रिणी संघाचे मी अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो.
प्रा.देवानंद पवार, 9158359628 औरंगाबाद,महाराष्ट्र.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *