चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच दुचाकीसह एक लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋशेष चंद्रभान आत्राम (वय २२, रा. विसापूर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात भिवापूर वार्डातील जुना बेनार चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी या कर्मचाऱ्यांचे पथक रामनगर आणि शहर पोलिस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरट्यांच्या शोधमोहिमेसाठी गस्तीवर होते. चंद्रपूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील भिवापूर वार्डातील जुना बेनार चौक परिसरात विसापूर येथील एक युवक एमएच ३४ एआर २७४८ क्रमांकाची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना या बाबतची माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन दुचाकीसह युवकाला ताब्यात घेतले. वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. ऋशेष चंद्रभान आत्राम (रा. विसापूर) असे त्याने आपले नाव सांगितले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने दोन दिवसांपूर्वी डीआरसी हेल्थ क्लब समोरून ही दुचाकी चोरली असून ती विकण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून पुन्हा कसून चौकशी केली असता सावली येथून दोन, भद्रावती आणि रामनगर पोलिस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एमएच ३४ एआर २७४८, एमएच ३४ बीएक्स ०६२२, एमएच ३४ बीयू ९१३०, एमएच ३४ झेड ००२३ आणि एक बिना क्रमांकाचे वाहन जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी यांच्या पथकाने केली.